‘त्या’ वाढीव १६५ कॉलन्यांमधील ‘अमृत’च्या कामाला मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:24+5:302021-07-05T04:12:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृतअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम जवळपास ९० टक्के ...

Awaiting approval for the work of 'Amrut' in 'those' additional 165 colonies | ‘त्या’ वाढीव १६५ कॉलन्यांमधील ‘अमृत’च्या कामाला मंजुरीची प्रतीक्षा

‘त्या’ वाढीव १६५ कॉलन्यांमधील ‘अमृत’च्या कामाला मंजुरीची प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या तीन वर्षांपासून अमृतअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, मनपा प्रशासनाच्या चुकांमुळे शहरातील वाढीव भागातील १६५ कॉलन्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला नव्हता, या योजनेचे काम पूर्ण होत आल्यावर वाढीव भागातील नळ कनेक्शनचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपूर्वी मनपा प्रशासनाने यावर डीपीआर तयार केला होता. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून शासनाची मंजुरी मिळाली नसल्याने हे काम रखडले आहे.

अमृतअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र, शहरातील वाढीव भागात अद्यापही या कामाला सुरुवात झालेली नाही. वाढीव भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या कायम असून, या वाढीव भागात देखील अमृतचे पाणी मिळावे यासाठी नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी मनपाच्या महासभेत सातत्याने प्रश्न उपस्थित करून, १६५ कॉलन्यांमध्येही अमृतचे पाणी मिळावे यासाठी नव्याने डीपीआर तयार करून, महासभेची मंजुरी मिळवून, हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

वाढीव निधीची पडणार नाही गरज

वाढीव भागातील कामासाठी तयार करण्यात आलेल्या डीपीआरअंतर्गत मनपाने ३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामात काही निधी शिल्लक राहणार असल्याने शिल्लक निधीतूनच हे काम मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच या कामासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया न राबविता सद्यस्थितीत काम करत असलेल्या जैन इरिगेशन या कंपनीलाच हे काम देण्यात येणार असल्याचीही माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तांत्रिक अडचणींची करण्यात आली दुरुस्ती

मनपाकडून वाढीव भागातील कामांसाठी नव्याने डीपीआर तयार करून, शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर शासनाने या प्रस्तावात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणी दुरुस्त केल्यानंतर पुन्हा हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, आता लवकरच शासनाकडून मंजुरी मिळेल आणि कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Awaiting approval for the work of 'Amrut' in 'those' additional 165 colonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.