शिरसोलीकरांना लसीकरणाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:16 AM2021-05-08T04:16:18+5:302021-05-08T04:16:18+5:30
शिरसोली : कोविड लसीकरण गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असले तरी शिरसोली येथील जनता लसीविनाच आहे. म्हसावद येथे ...
शिरसोली : कोविड लसीकरण गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असले तरी शिरसोली येथील जनता लसीविनाच आहे. म्हसावद येथे लसीकरण सुरू असले तरी येथील वृद्धांना लसीकरणासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. शिरसोली येथे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.
शिरसोली प्र.बो. व शिरसोली प्र.न. ही दोन स्वतंत्र गावे आहे. शिरसोली गाव हे जळगावपासून नऊ किमी अंतरावर असल्याने येथील बहुतांश ग्रामस्थांचा जळगाव शहराशी संबंध येत असतो. यामुळे दोन्ही गावात बरेच कोरोना रुग्ण आहेत. काही जणांनी कोरोनावर मात केली असली तरी बऱ्याच व्यक्तींना आपला जीवही गमवावा लागला आहे. शिरसोली येथील ग्रामस्थांना लसीकरणासाठी तेरा किमी अंतरावर असणाऱ्या म्हसावद येथे जावे लागते. म्हसावद येथे बऱ्याच वेळा लस उपलब्ध नसते तर कधी कमी लस उपलब्धतेमुळे गर्दी होते. लसीकरणासाठी होणार्या त्रासामुळे येथील जनता वैतागली आहे. गावात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आरोग्य विभाग ग्रामपंचायतने लसीकरणासाठी संयुक्त प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.