जागोजागी बोकाळले अवैध धंदे
By admin | Published: January 30, 2017 12:52 AM2017-01-30T00:52:52+5:302017-01-30T00:52:52+5:30
पाचो:यातील स्थिती : खुलेआम चालतो सट्टा, अवैध वाहतूक तर बेलगाम
पाचोरा : शहराच्या मध्यवर्ती भागात अवैध धंदे जोरात सुरू असून अवैध वाहतूकही वाढली आहे. याकडे प्रशासन मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संतापही व्यक्त होत आहे.
शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिवाजी चौकातील बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल परिसरात सट्टय़ाच्या दुकानांचे व टप:यांचे पेव फुटले आहे. पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. याच परिसरात लहान-मोठी व्यापारी संकुले असून मुख्य बाजारपेठही आहे. भाजीमंडीदेखील असून गर्दीच्या ठिकाणी राजीव गांधी टाऊन हॉलच्या बाजूला असलेल्या मिनी शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर मोठे पत्र्याचे शेड टाकून सट्टय़ाचे दुकान थाटले आहे. लहान लहान टप:यांपासून ते मोठय़ा दुकानांर्पयत सट्टय़ाच्या पेढय़ा शहरातील विविध भागातही सर्रास सुरू आहेत.
लहान मुलांवर विपरीत परिणाम
शहरातील सभ्य नागरिकांना या परिसरातून वावरताना अवैध धंद्याचे दर्शन घ्यावे लागत आहे. अगदी बाजारपेठेतदेखील ही दुकाने सजली असल्याने दुकानात चिकटलेल्या कागदांपासून फळे व पाटीवर दिसणारे अंकगणित व बाराखडीचा अर्थपूर्ण अभ्यास लहान शाळाकरी मुलांपासून मोठय़ांर्पयत सगळ्यांना होत असतो. याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होत आहे.
जीवघेणी वाहतूक
याव्यतिरिक्त जारगाव चौफुलीहून शेंदुर्णी, पहूर, भडगाव, जळगाव या अनेक शहरार्पयत आणि गावार्पयत होणारी जीवघेणी अवैध वाहतूक सोयीस्करपणे दुर्लक्षित केली जात आहे. लहान-मोठे टेम्पो, ट्रॅक्स व कालीपिलीच्या माध्यमातून ही वाहतूक सुरू असून प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवले जातात व लवकर पोहचण्याच्या अपेक्षेने प्रवासीदेखील दुर्घटनेचा विचार न करता धोका पत्करून या अवैध वाहतुकीचा मार्ग अवलंबताना दिसत आहेत. अलीकडेच सावखेडा येथे झालेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या अपघाताची भीषण घटना ताजी असतानाही प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. याचबरोबर अनेकदा प्रवासी भरताना रस्त्यावरच वाहन उभे केले जाते, यामुळे इतर वाहनधारकांची गैरसोय होत असते. काही वेळेस तर वाहतुकीची कोंडीही होताना दिसते. अशा प्रसंगी काही चालक अरेरावी करतात. परिणामी भांडणेही होत असतात. त्यामुळे वाहतुकीस शिस्तही लावण्याची गरज आहे. (वार्ताहर)
दखल घेण्याची मागणी
अवैध वाहतूक व अवैध धंदे इतके सर्रास सुरू आहेत की, प्रशासन हेतूपुरस्सर अर्थपूर्ण कानाडोळा करीत आहे की काय हा संभ्रम व्हावा अशी स्थिती आहे. पाचोरा शहरातील हे अवैध धंदे तत्काळ बंद व्हावेत अशी सामान्य आणि सुज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे. तर लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त आहे.