‘त्या’ वेबसिरीजद्वारे अंधश्रद्धेविषयी प्रबोधनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:47 PM2021-05-19T16:47:07+5:302021-05-19T16:47:26+5:30
गेल्या काही दिवसांपासून याबाबत सोशल माध्यमावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर नारायणदास अग्रवाल यांनी आपली भूमिका बुधवारी स्पष्ट केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : आ.बं. विद्यालयात चित्रीत झालेल्या वेबसिरीजद्वारे अंधश्रद्धेविषयी प्रबोधनाचा संदेश दिला असून संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी ही निर्मिती केली आहे. त्यांच्या कला - गुणांना प्रोत्साहन मिळावे. या तळमळीतूनच चित्रीकरणाला परवानगी दिली. यामुळे शाळा व संस्थेच्या बदनामीचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून याबाबत सोशल माध्यमावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर अग्रवाल यांनी आपली भूमिका बुधवारी स्पष्ट केली.
शाळेच्या परिसरात ‘परछाया’ या वेबसिरीजचे चित्रीकरण करण्यात आले. यात भीतीदायक दृष्य असून यामुळे शाळेची प्रतिमा डागाळल्याची प्रतिक्रिया काही माजी विद्यार्थ्यांमधून उमटली होती. या वेबसिरीजमुळे विद्यार्थ्यांना मनावर विपरीत परिणाम होतील, असा सूर माजी विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमावर व्यक्त केल्याने या चर्चेला चांगलेच तोंड फुटले. संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी शाळेच्या दोन्ही विभागातील मुख्याध्यापकांना नोटीस बजावून याबाबत तत्काळ खुलासा सादर करण्याचे पत्र दिले. याबाबत नारायणदास अग्रवाल यांनी व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपली सविस्तर भूमिका सांगितली.
अग्रवाल यांनी म्हटले आहे की, वेबसिरीज तयार करणारे हे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. म्हणूनच चित्रीकरणाला परवानगी दिली. या वेबसिरीजमध्ये अंधश्रद्धेविषयी जनजागृती केली गेली आहे. त्यामुळे शाळेची प्रतिमा मलिन होण्याचा प्रश्नच नाही.
युवापिढीच्या मनात अंधश्रद्धा व त्यापोटी उत्पन्न होणारे भय याचे निराकरण करण्याचा वेबसिरीजचा मुख्य उद्देश असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितल्यानेच चित्रीकरणासाठी परवानगी दिली. तसेच या वेबसिरीजद्वारे समाजव्यवस्थेला कोणतीही बाधा येणार नाही, याबरोबरच शाळा व संस्थेच्या प्रतिमेला कुठेही तडा जाणार नाही, अशी लेखी ग्वाही या विद्यार्थ्यांनी दिली होती. असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
नेहमी संस्था हितालाच सर्वोच्च प्राधान्य
गेली पाच दशके संस्था योगदान देत आहे. यात संस्थेचे हित हे सर्वोच्च मानले आहे. आमच्या परिवाराने सदोदित समाजहिताची भूमिका घेऊन अनेकविध शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक उपक्रम राबविले आहेत. समाजातील तळागाळातील व्यक्तींना मदतही केली आहे. संस्थेबाबतही हीच भूमिका घेऊन काम करीत आहे. संस्थेची प्रतिमा नेहमीच जपली आहे, असेही नारायणदास अग्रवाल यांनी सांगितले.