पुरस्कार सोहळ्याकडे लागले सा:यांचे लक्ष
By admin | Published: January 23, 2017 12:03 AM2017-01-23T00:03:42+5:302017-01-23T00:03:42+5:30
निशा पाटीलचा आज गौरव : गावक:यांमध्ये आनंदाचे वातावरण, 31 रोजी काढणार मिरवणूक
भडगाव : निशा पाटीलचा बाल शौर्य पुरस्काराने गौरव होत असल्याने गावात आणि परिसरात आंनदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. गावाचे नाव देशपातळीवर तिने नेल्याने सर्वाची छाती अभिमानाने फुलली असून सर्वाचे डोळे या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे लागले आहे.
निशाने आगीतून लहान मुलीचा जिव वाचविला होता. या धाडसाची नोंद घेत पंतप्रधानांच्या हस्ते 23 जानेवारी रोजी दिल्ली येथे निशाचा बाल शौर्य पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. 26 जानेवारी रोजी राजपथावर होणा:या पथसंचलनातही निशा सहभागी होणार आहे. देशातील 25 बालकांना बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात भडगावची निशा पाटील ही महाराष्ट्राची एकमेव वीरबाला आहे. यासाठी आदर्श कन्या विद्यालयाचा शिक्षकवर्ग, विद्यार्थिनींमध्ये आनंद पसरला आहे.
निशाला बाल शौर्य पुरस्कार जाहीर होताच शाळेतील संचालक मंडळ, शिक्षक, विविध संघटनांनी तिचा सत्कार केला. यशवंतनगर जि.प. शाळेची ती माजी विद्यार्थिनी आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी निशाचा जि.प.शाळेनेही सत्कार केला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा कमल अहिरे होत्या. सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले. संतोष महाजन, जगन्नाथ भोई, राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक सुनील निकम व शिक्षक हजर होते.
दरम्यान 31 जानेवारी रोजी आदर्श कन्या विद्यालयातर्फे तिची मिरवणूक काढली जाणार आहे असे विद्यालयाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)
क्रीडा क्षेत्रातही कामगिरी
निशाचा स्वभाव शांत असून ती हुशार आहे. लहानपणापासून धाडसी आहे. क्रीडा क्षेत्रातही ती मागे नाही. तालुकस्तरीय क्रीडा स्पर्धेत 400 मीटर रनिंग, लांबउडीतही तिने चमकदार कामगिरी केली आहे.
शेतात काम करुन शिकते निशा
निशा पाटील हिची परिस्थिती गरिबीची आहे. वडील दिलीप गुलाब पाटील, आई किरण पाटील, दोन भाऊ असा परिवार आहे. शेतमजुरी करुन परिवाराचा उदरनिर्वाह होतो. निशाही सुटीच्या दिवशी शेतात कामाला जाते व शिक्षणही घेत आहे.
जिवाची पर्वा न करता वाचविले बालिकेला
14 जानेवारी 2015 रोजी सकाळी 10 वाजता निशा पाटील मैत्रिणीकडे आली असताना यशवंतनगरातील कस्तुराबाई नथू देशमुख यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली होती. घरातील सदस्य मजुरीला गेल्याने घरात कुणीच नव्हते. यावेळी घरात झोक्यामध्ये सात महिन्याची पूर्वी देवकर देशमुख ही झोपली होती. तिचा रडण्याचा आवाज येताच निशाने जीवाची पर्वा न करता घरात घुसून आगीतून पूर्वी हिला सुखरुप बाहेर काढले होते. पूर्वीची आई मोठय़ा मुलाला शाळेत पोहचवण्यास गेली होती. देशमुख परिवाराने निशाच्या या धाडसाचे कौतुकही केले.