अहिराणी साहित्यिक गुरू गौरव पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:15 AM2021-07-25T04:15:01+5:302021-07-25T04:15:01+5:30
अमळनेर : उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त अहिराणी भाषेतील ज्येष्ठ १४ ...
अमळनेर : उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त अहिराणी भाषेतील ज्येष्ठ १४ साहित्यिकांना साहित्यिक ‘गुरू गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गुरुपौर्णिमेनिमित्त २३ जुलै रोजी ऑनलाइन झालेल्या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मानसशास्रज्ञ डाॅ.आरती सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नामदेव ढाके होते.
राजेश पाटील यांनी खान्देशी माणसाचे गुणगाण केले. खान्देशी माणूस जिद्दी व कामाच्या चिकाटीमुळे प्रत्येक मोठ्या शहरात वसला आहे, असे सांगत अहिराणी भाषा लुप्त होऊ नये म्हणून येणाऱ्या पिढ्यांनाही अहिराणीचे धडे देण्याचे आवाहन केले.
नगरसेवक नामदेव ढाके व आयुक्त राजेश पाटील यांनी पुण्यात खान्देश भवन निर्मितीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी ए.जी. पाटील, डाॅ.आरती सूर्यवंशी, बापूसाहेब हटकर, प्रा.सदाशिवराव माळी यांनीही मनोगत व्यक्त केले.
पुरस्कारार्थी असे-
प्राचार्य सदाशिवराव माळी, कृष्णा आनंदा पाटील, सुभाष अहिरे, डॉ.उषा सावंत, विमल वाणी, सुरेश आर.पवार, रामदास वाघ, बापूसाहेब देवीदास हटकर, डॉ. रमेश सूर्यवंशी, डॉ. सुधीर देवरे, प्रकाश पाटील, पिंगळवाडेकर, शकुंतला पाटील रोटवदकर, नारायण हरी महाजन, रत्ना पाटील या साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सोहळ्याचा उद्देश उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सन्मान पत्राचे वाचन वर्षा पाटील व एम.के भामरे यांनी केले. ऑनलाइन कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबी भिला पाटील व प्रशांत पाटील यांनी सांभाळल्या.
सूत्रसंचालन अहिराणी परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब पिंगळे व प्रा.प्रकाश माळी यांनी, तर पी.झेड. कुवर यांनी आभार मानले.