खान्देशातील ११ साहित्यिकांचा खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 07:40 PM2019-12-17T19:40:33+5:302019-12-17T20:03:24+5:30
महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
अमळनेर, जि.जळगाव : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ शाखा नाशिकच्या वतीने खान्देशातील साहित्यिकांचा नाशिक येथे अहिराणी साहित्य संमेलन झाले. त्यात खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (अमळनेर), सुनंदा वैद्य, प्रभा बैकर (धुळे), प्रा.डॉ.किसन पाटील (जळगाव), प्रा.वा. ना. आंधळे (धरणगाव), प्रा.तानसेन जगताप (चाळीसगाव), रामदास वाघ (धुळे), डॉ.रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) यांना खान्देशभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अहिराणी ही महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील बहुतांश भागात तसेच गुजरात प्रांतातील काही भागात बोलली जाणारी बोलीभाषा असून, या भाषेच्या संवर्धनासाठी लोकव्यवहार, शिक्षण व्यवहार, राजव्यवहार आणि ग्रंथव्यवहार या भाषेतून होण्याची गरज आहे किंबहुना अहिराणी भाषा टिकविण्यासाठी आणि जतन करण्यासाठी घरा-दारातून आणि सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व कीर्तनकार प्रा.चत्रभुज पाटील यांनी केले.
व्यासपीठावर मुंबई येथील राजेंद्र गोसावी, प्रा.सदाशिव सूर्यवंशी, डॉ.एस.के.पाटील, नाना महाजन, डॉ.कृष्णाभाई पटेल, अनिल राजपूत व विजय चव्हाण उपस्थित होते. ग्रंथदिंडी, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे गोंधळी नृत्य तसेच ग्रंथकानबाई मिरवणुकीने प्रथम सत्रास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. कमलाकर देसले यांच्या अहिराणीतील पसायदानाने प्रथम सत्राचा समारोप झाला.
दुपारच्या सत्रात बापूसाहेब हाटकर यांच्या अध्यक्षतेखाली अहिराणी भाषेचा प्रचार आणि प्रसार या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यात प्रा.रमेश सूर्यवंशी, प्रा.सदाशिव सूर्यवंशी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन रमेश धनगर यांनी केले. त्यानंतर मान्यवर तसेच नवोदित कवींचे कविसंमेलन रंगले. खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या अध्यक्षा सुनीता पाटील यांनी प्रास्ताविक तर निकिता पवार यांनी सूत्रसंचालन केले.
अहिराणी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ यांच्या ‘ओवी अनुभवावी अहिराणी’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.