रोटरी क्लबतर्फे १५० रिक्षांवर व बसेसवर पोस्टर चिकटवून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:48+5:302021-07-05T04:11:48+5:30
कोरोनाकाळात रोटरी क्लबतर्फे ५,००० मास्कचे वाटप, कोविड-१९ पासून संरक्षण व उपाययोजनांसंदर्भात चौकात बॅनर्स लावून जनजागृती, मागील वर्षी ऑक्सिजन पाइप ...
कोरोनाकाळात रोटरी क्लबतर्फे ५,००० मास्कचे वाटप, कोविड-१९ पासून संरक्षण व उपाययोजनांसंदर्भात चौकात बॅनर्स लावून जनजागृती, मागील वर्षी ऑक्सिजन पाइप लाइनसाठी भरीव मदत, ३ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशिन्सचे तहसीलदार अनिल गावित यांच्या हस्ते लोकार्पण केले. कोरोनातून डिस्चार्ज झालेल्या पेशंटसाठी चोपडा रोटरीच्या माध्यमातून बेड, वॉकर, एअर बेड, वॉटर बेड, व्हील चेअर, कमोड चेअर, ट्राय पॉड, ट्राय पॉड स्टिक, ऑक्सिजन मशिन्स आदी साहित्य उपलब्ध करून दिले.
प्रशासनातर्फे सर्वत्र लसीकरण सुरू झाले आहे; परंतु सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या चुकीच्या संदेशांमुळे नागरिक लसी घेण्यास अजूनही तयार नसल्यामुळे, रोटरी क्लब चोपडा यांनी लोकांना व्हायरसची लसी देण्यास प्रोत्साहित करण्यासाठीच नव्हे, तर कोविड- १९ विषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘आपण लस घेऊ या... कोरोनाला हरवू या..!’, ‘कोरोना लाट थोपविण्यासाठी घेऊ खबरदारी, लसीकरण करून घेणे हीच आता सर्वांची जबाबदारी!’ या आशयाची घोषणा वाक्य असलेले रोटरी क्लब चोपडातर्फे १५० रिक्षांवर व एसटी बसेसवर पोस्टर चिकटवून लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
कार्यक्रमास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंह चौहान व चोपडा बस आगाराचे व्यवस्थापक संदेश क्षीरसागर यांच्या हस्ते ३ रिक्षांवर व बसेसवर पोस्टर लावून या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव, मानद सचिव ॲड. रूपेश पाटील, प्रफुल्ल गुजराथी, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, प्रदीप पाटील, चेतन टाटिया व इतर सर्व रोटरी सदस्य उपस्थित होते.