ध्वनिक्षेपकातून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:17+5:302021-04-27T04:16:17+5:30
रुग्णालय परिसरात शुकशुकाट जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेशास बंदी केल्याने सलग दुसऱ्या दिवशी रुग्णालय ...
रुग्णालय परिसरात शुकशुकाट
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेशास बंदी केल्याने सलग दुसऱ्या दिवशी रुग्णालय परिसरात शुकशुकाट होता. नातेवाईकांची थोेडीही गर्दी झाल्यास तातडीने वॉर रूममधून सूचना देण्यात येतात व नातेवाईकांना रुग्णालयाबाहेर काढण्यात येते. दोन दिवसांपासून याबाबत कडक पावले उचलण्यात आली आहेत.
लस मिळेना
जळगाव : रविवारी काही खासगी केंद्रांवरही लस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना लस न घेता परतावे लागेल. अनेक दिवसांपासून नोंदणी करून नंबर लागल्यावर लस उपलब्ध नसल्याने आम्हाला परतावे लागल्याचे सांगत या नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. मात्र, लसीचा पुरवठाचा नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
स्थिती नियंत्रणात
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आपत्कालीन कक्षात गेल्या दोन दिवसांपासून जेवढे बेड तेवढेच रुग्ण दाखल असल्याने स्थिती नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी रुग्णांना खुर्चीवर बसून वेटिंगवर राहावे लागत होते. मात्र, दोन दिवसांपासून आता जागा उपलब्ध होत आहे.
जि. प. त बंधने
जळगाव : जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची केवळ १५ टक्के उपस्थिती असून उपस्थितीवर बंधने लावण्यात आली आहे. यामुळे कामावर परिणाम होणार असल्याने कामे खोळंबण्याची शक्यता आहे. एका कर्मचाऱ्याला एक दिवस ड्युटी व सहा दिवस सुटी असे हे रोटेशन राहणार आहे. अधिकारी वर्ग मात्र उपस्थित राहणार आहे.