अज्ञातांकडून जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:28 AM2021-02-06T04:28:41+5:302021-02-06T04:28:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जातात. तसेच वृक्षारोपणासाठी ...

Ax on old trees from strangers | अज्ञातांकडून जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड

अज्ञातांकडून जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जातात. तसेच वृक्षारोपणासाठी देखील जनजागृती केली जाते. मात्र, दुसरीकडे शहरातील जुन्या आणि भल्यामोठ्या वृक्षांवर अज्ञांताकडून कुऱ्हाड टाकली जात आहे. गेल्या काही दिवसात शहरात अनेक ठिकाणी मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी शिवाजीनगर भागात देखील ५० वर्षे जुने निंबाचे झाड अज्ञातांनी तोडले, हा प्रकार शिवसेनेचे विभागप्रमुख विजय बांदल यांनी उघडकीस आणला असून, याबाबत मनपा प्रशासनाकडेदेखील तक्रार केली आहे.

मनपा प्रशासनाकडून ऑक्सिजन पार्कव्दारे हजारो वृक्षांची लागवड कोट्यवधी खर्च करून केली जात आहे. कोट्यवधी खर्चूनदेखील वृक्षांची देखभाल मनपाकडून व नियुक्त केलेल्या मक्तेदाराकडून होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन वृक्ष लागवड देखील मनपाला करता येत नसून, जुने वृक्षदेखील आता सांभाळता येत नसल्याचे दिसून येत आहे. मेहरूण तलाव परिसर, शिवाजीनगर, राजाराम नगर, दादावाडी, खेडी, सावखेडा परिसरात गेल्या काही दिवसात अनेक वृक्षांची कत्तल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महावितरण, मनपाचे कर्मचारी असल्याचे सांगत तोडली जाताहेत वृक्ष

एखादे जुने वृक्ष तोडताना कुणी आक्षेप घेतल्यास वृक्ष तोडणाऱ्यांकडून महावितरण किंवा मनपाचे कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. तसेच वृक्ष तोडल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत ट्रकमध्ये भरून सर्व लाकूड उचलून नेले जात आहे. वृक्ष तोडताना चार ते पाच जण येतात, त्यामुळे नागरिकांनादेखील हे कर्मचारी मनपा किंवा महावितरणचेच असल्याचेच वाटते. त्यामुळे या वृक्षतोडीबाबत कुणी तक्रारदेखील करायला तयार नाही.

शिवाजी नगरात प्रकार आला उघडकीस

शिवाजीनगर भागातील काळे विहिरीजवळील सुमारे ५० वर्ष जुना वृक्ष अज्ञांताकडून तोडण्यात आले. झाडाचे लाकूड नेले जात असताना शिवसेनेचे शिवाजीनगर भागातील विभागप्रमुख विजय बांदल यांनी संबंधितांना मनपाची परवानगी घेतली आहे का ? असे विचारले. मात्र मनपाची परवानगी नसल्याने संबंधितांनी बांदल यांना विरोध केला. तसेच उर्वरित लाकूड भरून पळ काढला. एमएच १९- बीएम ०४२८ या क्रमांकाच्या वाहनातून सर्व लाकूड वाहून नेल्याची माहिती बांदल यांनी दिली. दरम्यान, याबाबत बांदल यांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली असून, याबाबत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गणेश घाटाजवळील जुने वृक्ष कोसळले

शहरातील मेहरूण तलावातील गणेश घाटाला लागून असलेले एक जुने निंबाचे वृक्षदेखील बुधवारी कोसळले आहे. हे वृक्ष कोसळले की कोणी तोडले हे समोर आलेले नाही. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या भागात जाऊन पाहणी केली असता, वृक्ष उतारावर होते. त्यामुळे एकाच बाजूला वजन गेल्यामुळे हे वृक्ष कोसळले असल्याची शक्यता आहे. पर्यावरणप्रेमी बाळकृष्ण देवरे यांना याबाबत विचारले असता, निंबाचे वृक्ष जुने झाल्यानंतर आतून पोकळ होत जाते. त्यामुळे ते कोसळते, हे वृक्षदेखील यामुळे कोसळले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, एक वृक्ष जगविण्यासाठी अनेक वर्ष लागत असतात, मात्र अनेक वृक्ष हे कोसळत जात आहेत. सार्वजनिक वृक्षांची निगा राखणे, वाकलेल्या झाडाला आधार देणे, रहदारीला अडचणीच्या असलेल्या फांद्या कापणे, झाडांच्या योग्य वाढीसाठी खालच्या फांद्यांची कटिंग करण्याची गरज असून, याकडेही मनपाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Ax on old trees from strangers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.