सद्यस्थितीतही आयुर्वेद प्रभावी - वैद्य पी.एस.चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:38 PM2018-11-06T12:38:27+5:302018-11-06T12:38:47+5:30
संशोधन केलेल्या २०० वैद्यांचा गौरव
जळगाव : विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन शोध प्रक्रियेतून आयुर्वेदाचेही स्वरुप अधिकाअधिक प्रभावीपणे जनमानसात स्थान निर्माण करीत असल्याचे मत प्रसिध्द वैद्य पी. एस. चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. या भारतीय चिकित्सा पध्दतीने प्राचीन काळापासून आपल्या वैशिष्टयाने आपले श्रेष्ठत्व आजही टिकवून ठेवल्याचे ते म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून धन्वंतरी जयंती उत्सव साजरे करणारे वैद्य पी.एस.चौधरी यांची धन्वंतरी जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने भेट घेतली असता, त्यांनी धन्वंतरी जयंती, तसेच त्यामागील भूमिका व कार्य यावर चर्चा केली.
४४ वर्षांपूर्वी चौधरी यांनी जोशी पेठेतील बागवान गल्लीत स्वत:च्या दवाखान्यात धन्वतरी जयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात या उत्सवाकडे कोणीच फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे या उत्सवास येणाऱ्यांची संख्या ८ ते १० इतकीच होती, मात्र हळूहळू ही संख्या वाढत गेली. आता ही संख्या २५० च्यावर पोहचली आहे. स्व.वैद्य भालचंद्र शंकर जहागीरदार, स्व.वैद्य मोतीराम तळेले, वैद्य निंबाळकर व वैद्य वर्डीकर अशी नामाकिंत वैद्य मंडळी तेव्हा होती.
आयुर्वेदाचा प्रसार करण्याचा प्रयत्न
जनसामान्यांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार व्हावा, दैनंदिन जीवनात सर्वसाधारण लोकांना आरोग्याचे महत्व कळावे या उद्देशानेच धन्वंतरी जयंती उत्सव साजरा केला जात असल्याचे वैद्य चौधरी म्हणाले. यासाठी दरवर्षी विद्वान वैद्यांना बोलावून विविध विषयावर व्याख्यानही घेतले जाते.
वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करणाºयांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी अशा व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. सी.व्ही.त्रिपाठी यांच्या मदतीने अखंडपणे हा उत्सव साजरा करीत असताना जयंत जहागीरदार व नरेंद्र गुजराथी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे चौधरी म्हणाले.
उत्कृष्ट कामगिरीमुळे गौरव
भारत सरकारने नुकताच धन्वंतरी दिन हा राष्टÑीय आयुर्वेद दिन म्हणून घोषीत केला आहे. त्यामुळे देशातील आयुर्वेद परंपरेला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. सर्व भारतीयांनी आयुर्वेद चिकित्सा पध्दतीचा आपले स्वास्थ व्रत समजून स्विकार केला पाहिजे, असेही मत चौधरी यांनी व्यक्त केले. दरम्यान, आयुर्वेदातील आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामागिरीमुळे पी.एस.चौधरी यांना पुणे येथे खडीवाले वैद्य यांच्याहस्ते ‘वैद्य शंकरदाजी पजे शास्त्री कार्यकर्ता’ या पुरस्काराने १९९१ मध्ये तर धुळे येथे २०१६ मध्ये गौरविण्यात आले आहे.