आयुर्वेदची या आठवड्यात ४०० कोरोना रुग्णांवर ट्रायल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:24 AM2021-02-23T04:24:03+5:302021-02-23T04:24:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या कोरोना उपचारावरील औषधांच्या प्रोजेक्टला आयुष मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर या आठवड्यात जिल्ह्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या कोरोना उपचारावरील औषधांच्या प्रोजेक्टला आयुष मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर या आठवड्यात जिल्ह्यातील ४०० रुग्णांवर या आयुर्वेद औषधांची ट्रायल घेतली जाणार आहे. तीन महिन्यानंतर याचे निष्कर्ष समोर आल्यावर ही औषधी कोरोनाचा शरीरातील फैलाव रोखण्यासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. मिलिंद निकुंभ यांनी दिली.
आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद निकुंभ यांनी या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्यासह सहायक प्राध्यापक संदीप बिनोरकर, एनआरएचएमच्या लीना बडगुजर, डॉ. नरेंद्र गुजराथी व डॉ. सुभाष वाडेकर यांनी यात सहकार्य केले आहे. ईएमआर प्रोजेक्ट म्हणून या औषधींबाबत आयुर्वेद महाविद्यालयाने आयुष मंत्रालयाला याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार डिसेंबर महिन्यात या प्रोजेक्टला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार या आठवड्यात ट्रायल सुरू केली जाणार आहे.
काय आहे औषधी
- यात एक च्यवनप्राश असून ते सकाळ संध्याकाळ एक चमचा घ्यायचे आहे. यासह एक काढ्याची पावडर असून काढा तयार करून तो घ्यायचा तसेच आयुर्वेदिक गोळ्यांचा यात समावेश आहे.
- कोरोना रुग्णालयात १५ दिवसांचा हा डोस दिला जाणार आहे.
- ही औषधी कोरोनापासून फुफ्फुसांचा बचाव करेल, कोरोना हा संसर्ग गंभीर होणार नाही, यापासून बचाव करेल.
कोट
यात च्यवनप्राश, काढा आणि गोळ्यांचा समावेश आहे. सर्व शास्त्रोक्त असल्याने याचे चांगले परिणाम आहेत. आयुष मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर ४०० रुग्णांवर त्याची ट्रायल केली जाणार आहे. कोरोनापासून येणाऱ्या लक्षणांवर ही औषधी नियंत्रण ठेवणार आहे. तुमच्या फुफ्फुसांना अधिक बळ देणार आहे.
- डॉ. मिलिंद निकुंभ, अधिष्ठाता, आयुर्वेद महाविद्यालय