आयुष्यमान भव: योजनेत जळगाव राज्यात अग्रेसर ठरेल - पालकमंत्री गुलाबराव पाटील
By विलास बारी | Published: September 17, 2023 10:59 PM2023-09-17T22:59:29+5:302023-09-17T23:00:55+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणारे 'आयुष्यमान कार्ड' चे घरोघरी वितरण करण्याचे काम प्रशासनाने करावे. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
जळगाव : जळगाव जिल्हा विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीत कायम अग्रेसर राहिला आहे. 'आयुष्यमान भव:' या योजनेत ही जिल्ह्याचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणारे 'आयुष्यमान कार्ड' चे घरोघरी वितरण करण्याचे काम प्रशासनाने करावे. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
'आयुष्मान भव:' अभियानांचा जळगाव जिल्ह्याचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, नागरिक यांच्यांशी फेसबुक लाईव्हद्वारे थेट संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यात १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, आयुष्यमान कार्डसाठी आपल्या जिल्ह्याचे उद्दिष्ट १४ लक्ष ६८ हजार ६२५ आहे. त्यापैकी चार लक्ष ९१ हजार ६७४ कार्ड वितरित करण्यात आलेले आहेत. उर्वरित कार्डधारकांना या मोहिमे दरम्यान आयुष्यमान कार्ड काढून देण्यासाठी सर्व आशा स्वयंसेविका कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित म्हणाले. 'आयुष्मान भव:' ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम असल्याचे सांगितले.