साकेगावात अजीम-ए- शान जलसा, १२० चिमुकल्यांनी घेतला सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:13 PM2019-05-04T17:13:55+5:302019-05-04T17:16:02+5:30
भुसावळ शहराजवळील साकेगाव येथे मुस्लीम समाज बांधवांतर्फे सलग दुसऱ्या वर्षी ‘अजीम-ए-शान जलसा’ उत्साहात पार पडला. यात १२० स्पर्धकांनी भाग घेतला.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : शहराजवळील साकेगाव येथे मुस्लीम समाज बांधवांतर्फे सलग दुसऱ्या वर्षी ‘अजीम-ए-शान जलसा’ उत्साहात पार पडला. यात १२० स्पर्धकांनी भाग घेतला. सर्व स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
बालूमिया परिसरात रात्री झालेल्या जलसाची सुरुवात पवित्र कुराण पठण करून करण्यात आली.
जलशात सहा वर्षांपासून तर १६ वर्षांपर्यंतच्या १२० चिमुकल्यांनी सहभाग घेतला.
आई-वडिलांचे जीवनातील महत्त्व यावर व सासू-सून यावर नाट्य सादर करण्यात आले.
आई-वडिलांचे जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान असून जगातील कोणीही व्यक्ती कधीही आई-वडिलांचे स्थान घेऊ शकत नाही. लहानपणापासून आई-वडील मुलांसाठी अथक परिश्रम करत असतात. स्वत: भुकेले राहून मुलांना शिक्षण देतात संस्कार देतात. आई-वडिलांना सन्मान द्या, योग्य वागणूक द्या, आदर करा, त्यांच्यातच देव आहे यावर नाट्य सादर करण्यात आले. तसेच आधुनिक काळामध्ये सासू-सून यांच्यातील छोट्या-छोट्या गोष्टीवरून वाद उद्भवतात. सामंजस्याने चर्चा करून व जबाबदारी ओळखून सुनेने सासुला आई व सासूने सुनेला मुलीसारखी वागणूक दिल्यास नक्कीच गैरसमज दूर होतील या ज्वलंत विषयावर नाट्य सादर करण्यात आले.
मराठीमध्ये तकरीर
इस्लाम धर्माविषयी समज गैरसमज तसेच इस्लाम धर्म हा शांती, अमन प्रस्थ असून कोणाच्याही कधीही भावना दुखावल्या जाणार नाही. यावर चिमुकल्यांनी तकरीर (प्रवचन) केले.
चिमुकल्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
लहान मुलींनी पांढरे शुभ्र पंजाबी ड्रेस व स्कार्फ घातले, तर मुलांनी सफेद पठाणी ड्रेस घालून डोक्यावर साफा बांधून उपस्थितांचे लक्ष वेधले.
चिमुकल्यांनी पवित्र कुराणाचे आयात दुवा याप्रसंगी सादर केल्या.
मौलाना फिरोज यांचे परिश्रम
मुलांची स्टेज डेअरिंग वाढावी, स्पर्धात्मक परीक्षेमध्ये भाग घेता यावा, संस्कार घडावेत, मोठ्यांचा आदर-सत्कार व्हावा, चिमुकल्यांचे सुप्त गुण समोर यावे व पालकांनी मुलांना प्रोत्साहित करावे या उद्देशातून गेल्या दोन महिन्यापासून मौलाना फिरोज यांनी परिश्रम घेत होते. १२० मुलांना स्पर्धेत जलशासाठी त्यांनी तयार केले. मौलाना फिरोज यांनाही उपस्थितांतर्फे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
सर्व स्पर्धकांना मिळाले बक्षीस
जलशामध्ये १२० स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रत्येकाने वेगवेगळ्या विषयाला गवसणी घालत उपस्थितांची मनं जिंकली. यासाठी प्रोत्साहनपर सर्व स्पर्धकांना बक्षीस म्हणून शालेय बॅग, पेन, कंपास पेटी देण्यात आले.
जलशासाठी प्रमुख पाहुणे व पंच म्हणून आंबा येथील मुक्ती शाकीर लोहारा तालुका शेगाव येथील मौलाना वसीम शिरसोली येथील मौलाना नफीस यांची उपस्थिती होती.