‘बाप’ नारळाचं पाणी... त्याच्या ओठी आईपणाची गाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:34+5:302021-06-20T04:12:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : एका इंग्रजी सुभाषिताचा अर्थ आहे, ‘पहाडासारखा बाप पाठीशी असल्यावर आपल्याला कोणतेही संकट हानी पोहोचवू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : एका इंग्रजी सुभाषिताचा अर्थ आहे, ‘पहाडासारखा बाप पाठीशी असल्यावर आपल्याला कोणतेही संकट हानी पोहोचवू शकत नाही...’ चाळीसगावच्या अवधूत पंढरीनाथ जोशी आणि सुरेंद्र मुरलीधर साळुंखे या ‘बाप’ माणसांनी आपल्या कुटुंबांसाठी हे खरे करून दाखवले आहे. दोन्ही कुटुंबांत ‘स्त्री’चा आधारवड कोसळल्यानंतर वडील आणि आई, अशा दोन्ही भूमिका वडिलांनीच वठवल्या. घराला घरपण देत बाप म्हणजे नारळातले गोड पाणी... अन् ओठी आईपणाची गाणी, अशी अनुभूतीच मुलाबाळांना दिली. पितृदिनाच्या पर्वणीवर म्हणूनच ही पितृगाथा संस्मरणीय ठरते.
वडिलांनी कधीही वडिलांचा बडेजाव न मिरवता आईची उणीव भासू दिली नाही. अशी कृतज्ञता मंदार जोशी आणि परिमल साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
वडिलांचा गाभारा, आईविषयी दोन्ही कुटुंबांतील प्रत्येकाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. घरातला पुरुष खांब निखळला, तर घरपण एकटीने तोलून धरणारे आईपणही श्रेष्ठच असते. तथापि, घरासोबत संसार आणि नोकरी सांभाळून मुलांना मोठे करणे वडिलांसाठी कसोटीच असते. या दोन्ही परिवारांतील वडिलांनी ही कसोटी यशस्वीपणे पूर्ण केलीय. जोशी व साळुंखे परिवाराचा गाभारा बापकर्तृत्वाने उजळून निघाला आहे.
अवधूत जोशी यांची एकाकी झुंज
लक्ष्मीनगरातील ८५ वर्षीय अवधूत पंढरीनाथ जोशी यांच्या पत्नी विजया जोशी प्राथमिक शिक्षिका होत्या. १९८७ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यावेळी १६ वर्षांचा मंदार आणि १८ वर्षांची स्वाती, अशी दोन मुले त्यांच्या डोळ्यात आईलाही पाहत होते. अवधूत यांची ६९ वर्षीय आईदेखील त्यांच्यासोबत होती. गेली २४ वर्षे आयुष्याचा डाव मोडल्यानंतरही अवधूत जोशी कुटुंबासाठी झुंजत राहिले. पत्नीच्या पश्चात मुलीचा विवाह, मुलाचे शिक्षण आणि त्याचाही विवाह हे कार्य पार पाडले. ‘वडिलांना दुसऱ्या विवाहासाठी स्थळंही आली. मात्र, त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार देत आम्हा भावंडांनाच सर्वस्व मानलं. आम्हाला कधीही आईची उणीव न भासू देता, घराचं घरपण किंचितही कमी होऊ दिलं नाही.’ असे सांगताना मंदार जोशी यांचा कंठ दाटून आला होता.
सुरेंद्र साळुंखे यांनी सावरले घराला
सहकार विभागात लेखापरीक्षण अधिकारी असलेल्या ६० वर्षीय सुरेंद्र मुरलीधर साळुंखे यांनीही पत्नीच्या पश्चात घराला सावरले. ते जुना मालेगाव रोड भागात राहतात. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा २९ वर्षीय मुलगा परिमल हा तीन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला असून, लवकरच वन विभागात वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून रुजू होत आहे. सुरेंद्र यांनी सलग नऊ महिने कोमात असलेल्या पत्नीची सेवा केली. याच काळात आईला सोबत करीत परिमलने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत त्यावर लखलखीत यशाची मोहोर कोरली. ‘आईचं छत्र तर हवंच. आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अर्थात, वडिलांनी एकाचवेळी या दोन्ही गोष्टी निभावल्या. माझ्या यशात त्यांचा वाटा मोठाच आहे, असे वडील प्रत्येकाला मिळोत. अशीच माझी देवाजवळ प्रार्थना आहे...’ आपल्या वडिलांची अशी अभिमान गाथा सांगताना परिमलला गहिवरून आले होते.
===Photopath===
190621\19jal_1_19062021_12.jpg
===Caption===
सुरेंद्र साळुंखे यांच्यासोबत मुलगा परिमल