एस.टी.बसची स्वच्छता करताना बांभोरीच्या चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 09:03 PM2018-07-16T21:03:53+5:302018-07-16T21:05:25+5:30
एस.टी.बसची स्वच्छता करीत असताना अचानक छातीत कळा येऊन उलटी झाल्याने प्रेमराज भागवत सपकाळे (वय ४१, रा.बांभोरी,ता.धरणगाव) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता धार शेरी (ता.धरणगाव) येथे घडली.
जळगाव : एस.टी.बसची स्वच्छता करीत असताना अचानक छातीत कळा येऊन उलटी झाल्याने प्रेमराज भागवत सपकाळे (वय ४१, रा.बांभोरी,ता.धरणगाव) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता धार शेरी (ता.धरणगाव) येथे घडली. प्रेमराज सपकाळे हे जळगाव आगारात चालक म्हणून नोकरीला होते.
रविवारी त्यांची धारशेरी मुक्कामी बसवर ड्युटी होती. सहकारी वाहक जाधव व सपकाळे दोघं जण बसमध्येच झोपले होते.सोमवारी सकाळी पाच वाजता ते उठून शौचास गेले. तेथून आल्यानंतर बसच्या काचा स्वच्छ करीत असताना अचानक त्रास होऊ लागला. काही क्षणातच त्यांना उलटी झाली. वाहक जाधव यांनी आरडाओरड करुन गावकºयांची मदत मागितली. गावात डॉक्टर उपलब्ध न झाल्याने सपकाळे यांना तातडीने दुसºया वाहनातून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
सपकाळे यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर एस.टी.महामंडळातील सहकाºयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सपकाळे यांच्या पश्चात पत्नी राणुबाई, मुलगी कल्याणी, पूजा व मुलगा शिवम असा परिवार आहे.शवविच्छेदन झाल्यानंतर सपकाळे यांचा मृतदेह बांभोरी येथे नेण्यात आला.