रस्त्यात प्रसूत झालेल्या महिलेचे बाळ दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 07:58 PM2019-06-19T19:58:35+5:302019-06-19T20:00:02+5:30
प्रसूतीसाठी कंडारी येथून माहेरी शिंगाईतला पतीसोबत दुचाकीवर येत असलेल्या महिलेची रस्त्यातच प्रसूती होऊन सात महिन्यांचे बाळ दगावल्याची घटना बुधवारी दुपारी नेरी-जामनेर रस्त्यावर घडली.
जामनेर, जि.जळगाव : प्रसूतीसाठी कंडारी येथून माहेरी शिंगाईतला पतीसोबत दुचाकीवर येत असलेल्या महिलेची रस्त्यातच प्रसूती होऊन सात महिन्यांचे बाळ दगावल्याची घटना बुधवारी दुपारी नेरी-जामनेर रस्त्यावर घडली.
सोनी सुनील बारेला (राहणार दहिगाव, ता.यावल) ही पतीसोबत दुचाकीने कंडारी, ता.भुसावळ येथून वडिलांकडे माहेरी शिंगाईत, ता.जामनेर येथे येत होती. तेव्हा रस्त्यातच तिला प्रसूतीच्या वेदना झाल्या व ती रस्त्यातच प्रसूत झाली. सात महिन्यांचे बाळ जागीच दगावले.
याठिकाणी जमा झालेल्या परिसरातील नागरिकांनी १०८ क्रमांकावर अॅम्बुलन्ससाठी संपर्क साधला, मात्र गाडी न पोहचल्याने भाजपचे अॅम्बुलन्स चालक जालमसींग राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महिलेस जामनेरला उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉ.प्रशांत महाजन यांनी उपचार केले. महिलेची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, खराब रस्त्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.