शैक्षणिक साहित्यांच्या खरेदीकडे पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:39 PM2020-07-24T12:39:42+5:302020-07-24T12:39:52+5:30
जळगाव : दरवर्षी जून महिन्याच्या पहिला आठवडा शालेय साहित्य खरेदीच्या लगबगीने सुरू होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे शालेय साहित्य खरेदीला ...
जळगाव : दरवर्षी जून महिन्याच्या पहिला आठवडा शालेय साहित्य खरेदीच्या लगबगीने सुरू होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे शालेय साहित्य खरेदीला घरघर लागली आहे. वह्या, पुस्तके रजिस्टरची विक्री मंदावली असून याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे़ शाळा कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता असल्यामुळे फ क्त दहा ते पंधरा टक्के शालेय साहित्यांची विक्री झाल्याची माहिती शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली़
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू होते. यामध्ये काही प्रमाणात शिथिलता सुध्दा देण्यात आली आहे. दरवर्षी जून महीन्याच्या सुरूवातीला शालेय साहीत्य खरेदीसाठी बाजारात मोठी उलाढाल व्हायची. शालेय साहित्य, बॅग, वह्या, पुस्तके, रजिस्टर, नवीन गणवेश, शूज, रेनकोट, छत्री या सारख्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळायची, व्यापारी वर्ग सुध्दा शालेय साहीत्याचा मोठा जमा करून ठेवत असायचे. मात्र, यंदा कोरोनाने थैमान घातल्यामुळे मार्च महिन्यांपासूनच शाळा, महाविद्यालय बंद झाली़ अन् अद्याप ती उघडलेली नाही़
इतर किंमती ‘जैसे थे’, मात्र बारावींच्या पुस्तकांच्या किंमतीत वाढ
मुलांना आवडणारे दप्तर, कंपास बॉक्स, छत्री, रेनकोट या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. आॅनलाईन शिक्षणामुळे अजूनही ग्राहक बाजारात फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे पहिली ते अकरावीच्या पुस्तकांसह वही, पेन व इतर शालेय साहित्यांच्या किंमती ‘जैसे थे’ आहेत़ मात्र, बारावीचा अभ्यासक्रमात बदल झाल्यामुळे नवीन पुस्तकांच्या किंमतीमध्ये पाच ते सहा टक्के वाढ झालेली आहे़ आॅनलाईन शिक्षणामुळे पालक पुस्तक खरेदीसाठी येत आहेत, मात्र इतर वस्तु खरेदीसाठी पालकांची गर्दी होत नसल्याचे पहायला मिळाले़
ट्रान्सपोर्ट बंदमुळे पूर्ण माल मिळेना!
पहिली ते दहावी पर्यंतची सर्व पुस्तके ही दुकानांमध्ये उपलब्ध झाली आहे़ अजूनही ट्रान्सफोर्ट नियमित सुरू नसल्यामुळे अवांतर विषयांची पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. लॉकडाऊनमुळे पुस्तक विक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसला असून अजूनही शाळा कधी सुरू होणार हे निश्चित नसल्यामुळे ग्राहकांनी शालेय साहित्य खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सम-विषम प्रमाणात दुकाने सुरू असल्यामुळे याचाही परिणाम जाणवत आहे.
शालेय साहित्यांची पंधरा ते वीस टक्के विक्री झालेली आहे़ ट्रान्सपोर्ट बंद असल्यामुळे अपूर्णच शालेय साहित्य उपलब्ध झालेले आहे़ त्यात सम-विषम प्रमाणात दुकान सुरू असल्यामुळे ग्राहकांनीही पाठ फिरविली आहे़ बारावीची पुस्तके वगळता इतर साहित्यांच्या किंमतींमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही़ लॉकडॉऊनमुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे़ - सुबोध नेवे, शालेय साहित्य विक्रेता