निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:27 PM2019-04-12T12:27:23+5:302019-04-12T12:27:59+5:30

जळगाव मतदार संघात १११ तर रावेर मतदारसंघात ८५ अवैध दारुचे गुन्हे दाखल

In the backdrop of elections, criminal cases against 196 people | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Next

जळगाव : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यासह अवैध दारु विक्री, आचारसंहिता भंग, रोख रक्कम जप्तच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत १११ जणांविरुद्ध तर रावेर मतदार संघात ८५ जणांविरुद्ध अवैध दारु विक्री प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. यासोबतच आचारसंहिता भंगाच्या ९ तक्रारी करण्यात आलेल्या असून त्यापैकी दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तर दोन्ही मतदारसंघात आतापर्यंत पथकाने २० लाख दोन हजार ५०० रुपयांची रक्कम जप्त केली आहे. एकूणच स्थिती पाहता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारुला मागणी वाढत झिंगही वाढू लागली आहे.
‘हातभट्टी’ जोरात
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव व रावेर मतदारसंघात केलेल्या कारवाईत सर्वाधिक हातभट्टीची दारु हाती लागली आहे. दोन्ही मतदार संघात मिळून ३ हजार ३० लीटर हातभट्टीची दारु कारवाईदरम्यान आढळून आली. उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा प्रशासनास दिलेल्या आकडेवारीनुसार जळगाव मतदार संघात एकूण १११ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या ३८ जणांना अटक करण्यात आले आहे. या मतदार संघात दोन हजार १६० लीटर हातभट्टीची दारु आढळून आली तर ६२ हजार ४२० लीटर रसायन पथकाने नष्ट केले. या सोबतच ८२.८८ लीटर देशी दारु, ५.४ लीटर विदेशी, ३० लीटर बिअर व इतर असे एकूण ५०५ लीटर मद्य व साहित्य कारवाई दरम्यान पथकाने जप्त केले आहे.
रावेर मतदारसंघात ‘विदेशी’ अधिक
रावेर मतदार एकूण ८५ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या २३ जणांना अटक करण्यात आलीआहे. या मतदारसंघात ८७० लीटर हातभट्टीची दारु आढळून आली तर २९ हजार ८१६ लीटर रसायन पथकाने नष्ट केले. या सोबतच २६.०४ लीटर देशी दारु, ५३.४१ लीटर विदेशी, २५ लीटर बिअर पथकाने जप्त केली आहे.
वाहने जप्त
अवैध दारु विरुद्ध कारवाई करताना जळगाव लोकसभा मतदारसंघात ५ लाख ५५ हजार रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली असून १४ लाख ७६ हजार ३८६ रुपये किंमतीचे इतर साहित्य जप्त केले. वाहने व इतर साहित्य मिळून २० लाख ३२ हजार ५८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशाच प्रकारे रावेर मतदार संघात ३ लाख रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली असून ७ लाख ७४ हजार २०६ रुपये किंमतीचे इतर साहित्य जप्त केले. वाहने व इतर साहित्य मिळून एकूण १० लाख ७४ हजार २०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे
जळगाव लोकसभा मतदारसंघात चार आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहे तर रावेर मतदारसंघात पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये रावेर मतदारसंघात विनापरवानगी भाजपचा प्रचार करण्यासाठी वाहन वापरल्याप्रकरणी मलकापूर येथे एक गुन्हा दाखल झाला. या सोबतच रावेर मतदारसंघातच भुसावळ येथे उमेदवार निवडून आल्यास मतदारास ५०० रुपये दिले जातील असे आमीष दाखविल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त इतर तक्रारींचे त्या-त्या पातळीवर निवारण करण्यात आले आहे तर वरिष्ठ स्तरावरील तक्रारी त्या-त्या ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत.
पाच ठिकाणी रक्कम जप्त
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या पथकांनी केलेल्या तपासणीदरम्यान पाच ठिकाणी २० लाख २ हजार ५०० रुपये जप्त केले आहे. यामध्ये मलकापूर येथे १ एप्रिल रोजी ४ लाख ७० हजार रुपये जप्त केले. २ रोजी पाचोरा येथे ५ लाख ४५ हजार रुपये, ५ रोजी जळगाव ग्रामीण भागात ३ लाख ५० हजार, ६ रोजी भुसावळ येथे ४ लाख ४० हजार रुपये आणि ८ रोजी पुन्हा भुसावळ येथे एक लाख ९७ हजार ५०० रुपये पथकाने जप्त केले.

Web Title: In the backdrop of elections, criminal cases against 196 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव