तोंडातील जीवाणूमुळे होऊ शकतो न्यूमोनिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:21 AM2021-08-27T04:21:41+5:302021-08-27T04:21:41+5:30
जळगाव : न्यूमोनिया होण्याची विविध कारणे आहेत. त्यातच दातांच्या फटांमध्ये अन्न अडकून त्यात होणारे जीवाणू श्वसनाद्वारे फुफ्फुसात जाऊन ...
जळगाव : न्यूमोनिया होण्याची विविध कारणे आहेत. त्यातच दातांच्या फटांमध्ये अन्न अडकून त्यात होणारे जीवाणू श्वसनाद्वारे फुफ्फुसात जाऊन न्यूमोनिया होण्याची शक्यता असते, त्यामुळे इतर बाबींप्रमाणे दातांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे मत छातीरोगतज्ज्ञ डॉ. कल्पेश गांधी यांनी दिली. त्यांनी कोविडमध्ये फुप्फुसांची कार्यक्षमता व ते सदृढ राहण्यासाठी काय उपाय योजना केल्या पाहिजेत याची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
वयोमानानुसार फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होत जाते, त्यामुळे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मागील दशकात फुप्फुसाच्या संसर्गजन्य रोगामुळे २६ लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. जळगावातही धुराव्यतिरिक्त धुळीमुळे होणाऱ्या फुप्फुसाच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. हे प्रमाण कोविडमुळे मास्क वापरणे वाढल्याने कमी झाल्याचे डॉ. कल्पेश गांधी यांनी सांगितले. दरम्यान, एकत्रित पद्धती व लसीकरणाचा वाढलेला टक्का बघता तिसरी लाट ही सौम्य असू शकते, असेही त्यांनी सांगितले. अन्य देशांमध्ये तिसरी लाट आलेली आहे. केरळमध्येही रुग्ण वाढत आहेत. त्यामानाने आपल्याकडे रुग्णसंख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
हे करा
पोटाचा घेर कमी करा : लठ्ठ व्यक्तींना जास्त घेरामुळे श्वास घेण्यासाठी प्राथमिक स्नायूंना योग्य काम करता येत नाही.
घाम येईपर्यंत व्यायाम करा, हिरव्या पालेभाज्या, प्रथिने, हळद, ओवा, आले यांचा आहारात पूरक वापर करा, श्वसनाचे व्यायाम करा, मत्स तेल सेवन करा, वेळोवेळी लसीकरण करून घ्या, वयाच्या ५५ वर्षांनंतर फुप्फुसाच्या कर्करोगाची तपासणी करून घ्या
‘तो’ धूर अधिक घातक
सध्या डासांपासून होणाऱ्या आजारांची संख्या वाढत असल्याने डास दूर पळविण्यासाठी बंद घरात कॉइल, अगरबत्त्या जाळल्या जातात. मात्र, हा धूर १०० सिगरेटच्या धुरा इतका घातक असतो. त्यामुळे बंद खोलीत तो अधिक धोकादायक असतो. त्यामुळे याऐवजी मच्छरदाणी किंवा खिडक्यांना जाळ्या लावाव्यात, असे डॉ. गांधी यांनी सांगितले.
पोस्ट कोविड रुग्ण कमी
पहिली लाट ही संथ गतीने वाढली व संथ गतीने कमी झाली. त्यातुलनेत दुसरी लाट मात्र अतिशय झपाट्याने वाढली व त्याच वेगाने कमी देखील झाली, असे सांगत दुसऱ्या लाटेत कोविडनंतर त्रास उद्भवणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याची माहिती डॉ. गांधी यांनी दिली. लंग फायब्रोसिस अगदी शंभरातून एका रुग्णाला झाल्याचे या लाटेत समोर आल्याचे त्यांनी सांगितले. अनेकांना काही महिन्यांपर्यंत उपचार घ्यावे लागलेत, मात्र कालांतराने ते ठीक झाले.