जळगावातील बाफना ज्वेलर्सच्या ८० संगणकातील डेटा हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 12:37 PM2019-11-29T12:37:47+5:302019-11-29T12:38:24+5:30

हॅकरकडून ६५ लाखाची खंडणीची मागणी

Bafna Jewelers hack computer data from Jalgaon | जळगावातील बाफना ज्वेलर्सच्या ८० संगणकातील डेटा हॅक

जळगावातील बाफना ज्वेलर्सच्या ८० संगणकातील डेटा हॅक

Next

जळगाव : प्रति सॉफ्टवेअर ९८० डॉलर या प्रमाणे खंडणी न दिल्याने हॅकरने जळगावच्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समधील ८० संगणकांतील साफ्टवेअरचा डेटा हॅक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ८० सॉफ्टवेअरची किंमत भारतीय चलनानुसार ६५ लाख रुपये आहे. दरम्यान, या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. डेटा हॅक केला असला तरी आमची सर्व माहिती सुरक्षित असल्याचा दावा ज्वेलर्सचे संचालक सिध्दार्थ बाफना यांनी केला आहे.
याबाबत गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. बाफना ज्वेलर्समध्ये दैनंदिन व्यवहारासाठी बिलींग सॉफ्टवेअर, कस्टमर डिटेल्स, ट्रान्झॅक्शन डिटेल्स व टेली इआरपी (अकाउंट विभाग) हे चार विभाग आहेत.
२४ नोव्हेंबर रोजी या चारही विभागातील ८० संगणकातील डेटा हॅक झाल्याचे व इनस्क्रीप्ट झाल्याचे लक्षात आले. इनस्क्रीप्ट झालेल्या एका फोल्डरमध्ये प्रति सॉफ्टवेअर ९८० डॉलर प्रमाणे खंडणी मागणीची एक नोट पॅड फाईल होती. त्यात तुमचा डेटा हॅक करण्यात आल्याचे सांगून हा डेटा परत मिळवून देवू शकतो त्यासाठी तुम्ही आमच्या संपर्क साधा असे सांगून ईमेल आयडीसुध्दा त्यांनी पाठविला होता. त्यावर कोणतीही एक फाईल पाठवा, ती फाईल विनाशुल्क क्लीअर करुन देवून. आम्हीच डेटा हॅक झाल्याची खात्री पटल्यानंतर ९८० डॉलरची पाठवा असे म्हटले होते.
त्यामुळे हा डेटा चोरी झाल्याचा संशय आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिध्दार्थ बाफना व जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधून झाल्याप्रकाराची माहिती व काही पुरावे सादर केले.
बॅकअपमुळे माहिती सुरक्षित
सिध्दार्थ बाफना यांनी सांगितले की, हॅकरने डेटा हॅक केला असला तरी संगणकातील बॅकअप आमच्याकडे असल्याने माहिती सुरक्षित आहे, मात्र चोरी व खंडणीचा प्रकार असल्यानेच पोलिसांकडे तक्रार केली. डेटा कोठून व कोणी हॅक केला हे स्पष्ट झालेले नाही. ९८० डॉलरप्रमाणे ६५ लाख रुपये दिले नाहीत तर भविष्यातही डेटा हॅक करण्याची धमकी हॅकरने दिली असल्याचे बाफना यांनी सांगितले. डेटा हॅकमुळे किंचीतशी माहिती गेली आहे, मात्र बॅकअपमध्ये सुरक्षित असल्याने त्याची नोंदणी आम्हाला पुन्हा करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील उपस्थित होते.

Web Title: Bafna Jewelers hack computer data from Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव