किराणा व्यापाराची दीड लाख रुपये रोकड असलेली बॅग लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:15 AM2021-04-02T04:15:55+5:302021-04-02T04:15:55+5:30
जळगाव : दाणाबाजारात किराणा माल घ्यायला आलेल्या उमेश रमेश कासट (वय ४२, रा. अडावद, ता. चोपडा) या व्यापाऱ्याची ...
जळगाव : दाणाबाजारात किराणा माल घ्यायला आलेल्या उमेश रमेश कासट (वय ४२, रा. अडावद, ता. चोपडा) या व्यापाऱ्याची १ लाख ६० हजार रुपये रोकड असलेली कापडी पिशवी, तर शेख नियाजोद्दीन शेख रियासोद्दीन (३६,रा. रामनगर) यांची ११ हजार रुपये रोख असलेली दुचाकीला लावलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. दोन्ही घटना अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने घडल्या. यात एक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडावद येथील किराणा व्यावसायिक उमेश रमेश कासट हे बुधवारी सायंकाळी सात वाजता किराणा माल घेण्यासाठी दाणा बाजारातील लिकासन ट्रेडर्स येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये कापडी पिशवी होती. त्या पिशवीमध्ये उधारीची चोपडी व १ लाख ६१ हजार रुपये रोख होते. दुकानात प्रवेश करताच अंग खाजायला लागल्याने घाईगडबडीत हातातील पिशवी त्यांनी दुकानाच्या बाहेरील टेबलावर ठेवली. अंग खाजवतच टी-शर्ट काढण्यासाठी बाजूला गेले. काही क्षणातच ते जागेवर आले असता टेबलावर ठेवलेली पिशवी दिसली नाही. त्यांनी बाहेर येऊन बघितले असता काळ्या रंगाचे टिपके असलेली मळकट रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, काळ्या रंगाचा मास्क घातलेली, सडपातळ शरीरयष्ठी असलेली एक अनोळखी व्यक्ती कापडी पिशवी घेऊन पळताना दिसली व ती पळून गेली. त्यांनी लागलीच दुकानाचे बाहेर खाली उतरून इतरांना घडलेला प्रकार सांगितला. हा सर्व प्रकार दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
आणखी एकाची बॅग लांबविली
दरम्यान, कासट बाजारात चोरट्याचा शोध घेत असतानाच तेथे रामनगरातील रहिवासी शेख नियाजोद्दीन शेख रियासोद्दीन यांच्या दुचाकीला लावलेली काळ्या रंगाची बॅगही चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये एक मोबाईल आणि ११ हजार रुपये होते. हे प्रकरण शहर पोलिसांत गेल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका दुकानात संशयित कैद झाला आहे, परंतु चेहरा स्पष्ट दिसत नाही. उमेश कासट यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार विजय निकुंभ करीत आहेत.