बहिणाबाई : एक संपन्न व्यक्तिमत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:28 AM2018-06-26T01:28:08+5:302018-06-26T01:28:32+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांनी ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कार्याविषयी घेतलेला आढावा.
कवयित्री बहिणाबाई चौधरींवर लिहिलेल्या लेख मालिकेतील हा शेवटचा लेख. रसिकांनी, साहित्यप्रेमींनी, साहित्याच्या जाणकारांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद साहित्याशी प्रत्यक्ष संबंध नाही, त्यांनीही दिला. सर्वांचे मनापासून आभार.
आजपर्यंतच्या लेखांमध्ये बहिणाबार्इंच्या काव्यातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहिणाबार्इंचा परिचय, जीवनाचे तत्त्वज्ञान, श्रमाची प्रतिष्ठा, भाव, विचार व कल्पना सौंदर्य, स्त्री-भावविश्व, बहुवस्तू स्पर्शी प्रतिभा, निसर्गकन्या या मुद्यांच्या आधारे बहिणाबाईच्या काव्यातील सौंदर्य व वैशिष्ट्य स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व मुद्यांचा विचार करत असताना बहिणाबार्इंचे विचार व स्वभावाचेही आकलन होत जाते. एकप्रकारे तिचे व्यक्तिमत्त्वच डोळ्यासमोर साकारते.
अंत:साक्ष व बहि:साक्षच्या आधारे बहिणाबाईला अधिक जवळून समजून घेता येते. तिच्या काव्यातून वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या विषयांसंबंधी व्यक्त झालेली तिची मते व तिच्याबद्दल तिच्या समकालीन व्यक्तींनी व्यक्त केलेले विचार यातून तिच्या स्वभावाचे दर्शन होते. बहिणाबाईच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विचार करत असताना तिचा काळ लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभाचा कालखंड सामाजिकदृष्ट्या व स्त्री-जीवनाच्या संदर्भात कसा होता हे समजून घेणे जरुरीचे आहे. या पार्श्वभूमीवर बहिणाबाईच्या विचारांचे व स्वभावाचे महत्त्व अधोरेखित करायला हवे.
बहिणाबाई तिच्या गाण्यांमध्ये जसे मोजून-मापून शब्द वापरत होती तसेच बोलतानासुद्धा शब्दांचा वापर जपून करायला हवा, योग्य तोच शब्द वापरावा, असा तिचा कटाक्ष होता. निरक्षर असूनसुद्धा तिला शब्दांचे महत्त्व व शब्दांची शक्ती माहीत होती. एकदा ती सोपानदेवांना म्हणाली, ‘‘तू जे सबद बोलतोस त्या शब्दांशी तू कधी बोललास का रे?’’ सोपानदेव म्हणाले, ‘‘शब्दांशी कसं बोलायचं?’’ मग तिने एक उदाहरण देऊन स्पष्ट केलं व म्हणाली, ‘‘एकेक सबद कसा ग्यान शिकवतो, ते शिकलं पाहिजे.’’ हा संवाद वाचल्यानंतर तुकाराम महाराजांच्या,‘‘आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने’’ ह्या ओळींची आठवण होते. बहिणाबाईच्या घरी महारवाड्यातून राधाबाई वाडा झाडायला यायची. काही जण तिला राधा महारीण म्हणून हाक मारत असत. सोपानदेवांनी लहानपणी तेच अनुकरण केलं तेव्हा बहिणाबाईकडून त्यांच्या थोबाडीतच बसायची, पण वाचले. परिणाम स्वरुप सोपानदेव तेव्हापासून राधामाय म्हणू लागले. कुणाच्या तोंडी शिव्या आल्या की बहिणाबाई म्हणायची, ‘‘अरे सबद सरेल की शिव्या तोंडी येतात अन् त्या सरल्या की मारामारी सुरू होते.’’ बहिणाबाई शिवीला ‘तोंडातला कीडा’ म्हणत असे. शिवी देणे तिला अजिबात खपत नसे.
जातीयतेबद्दलही तिचे विचार फार स्पष्ट होते. बाबा भटजी व तिचा संवाद ह्या दृष्टीने विचारणीय आहे. एका प्रसंगाच्यावेळी तिने बाबा भटजीला प्रश्न केला, ‘‘विठ्ठलाची पूजा केल्यावर नमन करताना त्यांच्या पवित्र पायावर डोकं ठेवता, मग त्या पवित्र पायातून जन्मलेले शूद्र कसे?’’ बहिणाबाई अडाणी असेल पण तर्कशुद्ध विचार करणारी होती.
बहिणाबाई अत्यंत उदार अंत:करणाची होती. दारी आलेल्या भिक्षेकऱ्याला मोठ्या मनाने सुपात धान्य देत असे. ‘‘धान थोडं असलं तरी मन सुपाएवढं असलं पाहिजे,’’ असे ती म्हणायची. धीरोदात्तता, संकटाच्यावेळी खचून न जाता दृढ राहण्याची वृत्ती, अपार कष्ट करण्याची जिद्द हे सर्व गुण तिच्या ठायी होते आणि अचानक आलेल्या वैधव्याच्यावेळी तेच तिच्या कामी आले. देवावर तिची श्रद्धा होती पण ती डोळस होती. अंधश्रद्धा नव्हती. तिचा देव या सर्व चराचरात, निसर्गात सामावेला होता. दु:खी, गांजलेल्या, पीडलेल्या माणसांबद्दल तिच्या मनात कणव होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती कर्मप्रिय होती. तिचा तिच्या कर्तृत्वावर विश्वास होता.
अशा रीतीने बहिणाबाईच्या काव्याचे रसग्रहण व अध्ययन करत असताना तिच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडत जातात व आपल्यासमोर एक अतिशय संपन्न व्यक्तिमत्त्व उभे राहते.
- प्रा.ए.बी. पाटील