बहिणाबाई महोत्सव झाला ‘लोकोत्सव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:05 PM2018-02-28T13:05:23+5:302018-02-28T13:05:23+5:30

सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी सांस्कृतिक चळवळ बळकट करणे ही आता काळाची गरज

Bahinabai festival jalgaoon | बहिणाबाई महोत्सव झाला ‘लोकोत्सव’

बहिणाबाई महोत्सव झाला ‘लोकोत्सव’

googlenewsNext
ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थितीसंस्कृती या शब्दात दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे तर स्वत:चा देह आणि मन बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वत:त बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत. पण जसजसे आधुनिकीकरणाचे वारे ग्रामीण भागापर्यंत पोहचू लागले तेव्हा ग्रामीण संस्कृतीचा काही प्रमाणात लोप होऊ लागला. मात्र आपल्या मातीचे ऋण फेडण्याची, संस्कृतीचे जतन करण्याची गरज निर्माण होऊ लागली. याच उद्देशाने भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून ‘बहिणाबाई महोत्सव’ ही संकल्पना दीपक परदेशी या तरुणाच्या डोक्यात आली आणि सुरू झाला खान्देशी मातीचे ऋण व्यक्त करणारा, खान्देशी संस्कृतीचे जतन करणारा ‘बहिणाबाई महोत्सव’. बघता बघता चार वर्षांच्या प्रवासात लोकांच्या उत्स्फूर्त व उदंड प्रतिसादामुळे ‘बहिणाबाई महोत्सव’ लोकोत्सव होऊन जनसामान्यांच्या मनावर राज्य करू लागला. याचे द्योतक म्हणजे या महोत्सवाला असणारी लोकांची उपस्थिती.
यंदाचे हे महोत्सवाचे चौथे वर्ष होते. ग्रामीण भागातील महिला बचत गटांचा, स्थानिक कलावंतांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यक्रमांना असलेली प्रेक्षकांची उदंड उपस्थितीने हा लोकोत्सव यशस्वी ठरला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जवळपास दीड हजार स्थानिक बाल कलावंतांनी बहिणाबाई महोत्सवाच्या रंगमंचावर आपली कला सादर केली. महिलांचे आर्थिक सबलीकरण हाही एक उद्देश या महोत्सवातून महिला बचत गटांच्या स्टॉलची वाढती संख्या पाहता साध्य होताना दिसत आहे.
मान्यवरांची उपस्थिती

खान्देशी मातीच्या सुजलाम सुफलामतेने राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्राला अनेक माणिक मोती दिले आहेत. या क्षेत्रातील मान्यवरांनी या महोत्सवाला हजेरी लावून कलावंतांना प्रोत्साहन दिले. महिला सक्षमीकरण हा सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेला हा महोत्सव लोकसहभागाच्या प्रचंड प्रतिसादामुळे आता लोकोत्सव झाला आहे. अनेक सामाजिक उत्सव वेळोवेळी होत असतात. पण एकच महोत्सव घेऊन त्यात विविध सामाजिक विषय हाताळून त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी अशाप्रकारे सांस्कृतिक चळवळ बळकट करणे ही आता काळाची गरज झाली आहे.
सिनेतारकांची उपस्थिती : महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने अधिकाधिक महिला या महोत्सवात सहभागी होत असतानाच, सिनेतारका सई ताह्मणकर, सोनाली कुळकर्णी यांची उपस्थिती होय. बहिणाबाई महोत्सवाला त्यांनी दिलेल्या हजेरीने महोत्सवाच्या प्रतिसादात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एखाद्या स्त्रीने ठरविले तर ती कोणत्याही क्षेत्रात सफल होऊ शकते याचे उदाहरण असणाºया दोन्ही सिनेतारका. सई ताह्मणकर तर सांगलीसारख्या ग्रामीण भागातून संघर्ष करीत आज या पदाला पोहचली आहे. महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने व खान्देशी तरुणींमधील आत्मविश्वास वाढवून भविष्यातील कलावंत व उद्योजिका घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता या सिनेतारकांची उपस्थिती महत्त्वपूर्ण ठरली. (पूर्वार्ध)
- विनोद ढगे

Web Title: Bahinabai festival jalgaoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव