वरखेडी येथील बहुळा नदीला अजूनही पाण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:16 AM2021-07-30T04:16:57+5:302021-07-30T04:16:57+5:30
वरखेडी, ता. पाचोरा : महाराष्ट्रात सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यातल्या त्यात काही जिल्ह्यांमध्ये तर अतिपावसामुळे हाहाकार माजलेला ...
वरखेडी, ता. पाचोरा : महाराष्ट्रात सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यातल्या त्यात काही जिल्ह्यांमध्ये तर अतिपावसामुळे हाहाकार माजलेला आहे. बऱ्याचशा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच पुन्हा पुन्हा पूर येत आहेत. परंतु मुर्डेश्वरच्या खोऱ्यातून उगम पावलेली बहुळा नदी मात्र अजूनही पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
मुर्डेश्वर खोऱ्यात अजूनही पाहिजे तसा दमदार पाऊस न झाल्यामुळे या नदीला एकही पूर आलेला नाही. नदीपात्रात बऱ्याच ठिकाणी अजूनही दूषित पाणी अडकूनच आहे. तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात नदीपात्रातील घाण व अनावश्यक वनस्पती फोफावलेली आहे. अनावश्यक वनस्पतीच्या अतिक्रमणाने नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात व्यापले गेल्याने नदीला नाल्याचे स्वरूप आले असून, पात्र हिरवेगार दिसून येते. याच नदीवर अवलंबून असलेला तालुक्यातील मोठा प्रकल्प म्हटला जाणारा बहुळा धरणदेखील आहे. या नदीपात्राचे खोलीकरण झाल्यास पाणी उपलब्ध राहून उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा निश्चितच कमी होतील. कारण गावाजवळच नदीपात्रात गावाला सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी विहीर असल्याने या विहिरीलादेखील बऱ्यापैकी पाणी उपलब्ध राहू शकते.