प्रमोद रायसोनींसह १४ जणांचे ७५ गुन्ह्यात जामीन अर्ज फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:17 AM2021-02-13T04:17:26+5:302021-02-13T04:17:26+5:30
जळगाव : बीएचआर पतसंस्थेत सभासदांच्या पैशांचा अपहार व फसवणूक केल्याच्या राज्यभरातील ७५ गुन्ह्यात संस्थापक चेअरमन प्रमोद रायसोनीसह १३ संचालक ...
जळगाव : बीएचआर पतसंस्थेत सभासदांच्या पैशांचा अपहार व फसवणूक केल्याच्या राज्यभरातील ७५ गुन्ह्यात संस्थापक चेअरमन प्रमोद रायसोनीसह १३ संचालक व १ कर्मचारी अशा १४ जणांचा जामीन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावले. न्या.आर.एन. हिवसे यांच्या न्यायालयात राज्यभरातील ८१ गुन्ह्यांचे कामकाज वर्ग करण्यात आले आहे. ३ मार्चपासून न्यायालयात आता नियमित कामकाज होणार आहे.
बीएचआरचा संस्थापक चेअरमन प्रमोद भाईचंद रायसोनी (५५,रा.बळीराम पेठ, जळगाव), दिलीप कांतीलाल चोरडिया (५१), सूरजमल भबुतमल जैन (५०),दादा रामचंद्र पाटील (६६), भागवत संपत माळी (६३), राजाराम काशिनाथ कोळी (४७), भगवान हिरामण वाघ (६०), यशवंत ओंकार जिरी (६०)शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (५५),सुकलाल शहादू माळी (४५)ललिताबाई उर्फ लता राजू सोनवणे (३९) सर्व रा.तळेगाव, ता.जामनेर, मोतीलाल ओंकार जीरी (५०,रा.शेळगाव, ता.जामनेर), डॉ.हितेंद्र यशवंत महाजन (५२,रा.बेंडाळे नगर, प्रेमनगर, जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४०,रा.महाबळ, जळगाव)यांच्याविरुध्द राज्यभरात ८१ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील गुन्ह्यात ४ खासगी दावे तेथील न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला अर्ज
याच गुन्ह्यातील महिला आरोपी लता सोनवणे यांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. १४ डिसेंबर २०१० रोजी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्याशिवाय इतर आरोपींनीही न्यायालयात यापूर्वी अर्ज दाखल केले होते, त्यांचेही अर्ज यापूर्वी फेटाळण्यात आलेले आहेत. २ जानेवारी २०१५ रोजी शिवराम चावदस चौधरी यांच्या फिर्यादीवरून १४ जणांविरुध्द रामानंद नगर पोलिसात पहिला गुन्हा दाखल झाला होता. सुकलाल माळी याचा ८ केसेसमध्ये तर सुकलाल व लता सोनवणे यांचा एकत्रित ५ केसेसमध्ये जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके तर संशयितांतर्फे ॲड.अकिल इस्माईल यांनी काम पाहिले.