अनैतिक संबंधात अडसर, आईकडून मुलाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:16 AM2019-02-27T00:16:21+5:302019-02-27T00:16:38+5:30
बेपत्ता विद्यार्थी प्रकरण, तिघे ताब्यात
चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील मंगेश दगडू पाटील या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने त्याचा सख्या आईसह दोन जणांनी खून केल्याचे उघड झाले आहे. ‘माता न तू वैरीणी’चा प्रत्यय येणाऱ्या या घटनेप्रकरणी मंगेशची आई गीता पाटील आणि तिचे ज्याच्याशी अनैतिक संबंध होते तो तिचा भाचा समाधान उर्फ संभा विलास पाटील (२५) आणि गल्लीतील रहिवाशी राजेंद्र पंढरीनाथ पाटील (३७) यांना ताब्यात घेतले आहे.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चहार्डी येथील मंगेश दगडू पाटील (१४) हा २ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याप्रकरणी चोपडा शहर स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मंगेश बेपत्ता झाल्याच्या चौथ्या दिवशी शिवाजीनगर शेजारी तुटलेला पाय आढल्याने या विद्यार्थ्याची नरबळीच्या उद्देशाने हत्या झाल्याची चर्चा सुरू झाली होती. यात श्वान पथकाला पाचारण करून मृतदेह शोधण्याचाही प्रयत्न केला मात्र श्वान पथकाने घटना ठिकाण ते त्याचे घर या दरम्यानच माग काढला होता. परंतु घरातील लोकं त्याचा खून कसा करणार म्हणून त्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. तसेच गावात आलेल्या भिक्षेकऱ्याने अपहरण केल्याच्या वृत्ताला उधाण आल्याने त्याचे छायाचित्रही जारी केले होते. मात्र त्यानंतरही खुनाचा उलगडा होत नव्हता. चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांचे पथक पाठविल्याने अनैतिक संबंधात हा विद्यार्थी अडथळा ठरल्याने त्याचा काटा काढण्यात आल्याची बाब पुढे आली. मयत मंगेश पाटील हा घटनेच्या दिवशी शौचालयाला गेल्यानंतर घरी परतला असता आई गीताबाई पाटील व राजेंद्र पाटील हे आक्षेपार्ह स्थितीत दिसल्याने मंगेशने वाद घातला. त्या वेळी तेथे समाधान पाटीलही पोहचला व तिघांनी मिळून मंगेशचा खून करीत मृतदेह गोणपाटात लपवून टाकला व शौचालयाच्या ठिकाणी मंगेशच्या चपला, रक्ताने माखलेले कपडे टाकून त्याचे अपहरण करून खून झाल्याचा ेबनाव करण्यात आला. आरोपींनी नंतर हा मृतदेह घटनास्थळापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील खादणीत टाकण्यात आल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती प्रशांत बच्छाव यांनी दिली.
आरोपी मंगेशची आई गीताबाई पाटील, समाधान उर्फ संभ्या विलास पाटील (२५),राजेंद्र पंढरीनाथ पाटील (३७) यांना २६ रोजी अटक करण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी तथा पोलीस उपविभागीय अधिकारी सौरभकुमार अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. त्यांना चोपडा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश लांडबळे यांनी ५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शर्शनाखाली चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पो. नि. मनोज पवार, चोपडा ग्रामीणच्या फौजदार अर्चना करपुडे, पोलीस नाईक संदेश पाटील, पोहेका शिवाजी बाविस्कर, पोकॉ हितेश बेहरे, सुनील कोळी, पो.ना. संतोष पारधी, विलेश सोनवणे, संगीता पवार यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.
आता खदानीत मृतदेहाचा शोध सुरू
चोपडा पोलिसांनी या प्रकरणात संशयीत म्हणून गीताबाई, राजेंद्र पाटील व समाधान पाटील यांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी संशयीतांनी मृतदेह ज्या खदानीत टाकला तेथे मयत मंगेशच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम दुपारी चार वाजता सुरू झाले. त्यासाठी नाशिक येथील विशेष पथक दाखल झाले आहे. तसेच विद्यार्थ्याचे घर असलेल्या शिवाजी नगर भागात संरक्षणासाठी मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे.