बालाजी रथोत्सवात पाचोरेकरांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 09:34 PM2018-11-22T21:34:21+5:302018-11-22T21:36:53+5:30
ढोल ताशांच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात गुरुवारी येथील रथोत्सव जल्लोषात साजरा झाला
पाचोरा - ढोल ताशांच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात गुरुवारी येथील रथोत्सव जल्लोषात साजरा झाला तर यात्रेने शहर फुलून गेले.
बालाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक दुपारी तीन वाजता सुरू होऊन उशिरा संपली. बालाजी महाराजांच्या रथाला दोर बांधून लोक समूहाद्वारे रथ गल्ली, विठ्ठल मंदिर रोड तलाठी कार्यालय, जामनेर रोड, महात्मा गांधी रोड या मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली.रस्त्याच्या दुतर्फा सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.मिरवणुकीत शहरातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यानिमित्ताने जामनेर रोड,शिवाजी चौक, गांधी चौक या ठिकाणी मोठी यात्रा भरलेली होती. रथयात्रेत लहान मुलांच्या खेळण्यांपासून विविध हॉटेल्स आणि भांड्यांच्या दुकानासह वेगवेगळे स्टॉल्स असतात तर सोने चांदी, कपडे आणि भांड्यांच्या दुकानातून मोठी आर्थिक उलाढाल होते. पाचोरा तालुक्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामीण भागातून लोकांची मोठी गर्दी होती.
रथ थांबवणे, वळवणे यासाठी लाकडी मोगरीचा उपयोग करण्यात आला. मोगरी लावण्याचे काम अशोक वाडेकर व सुभाष सोनवणे व संपूर्ण परिवाराने पार पडले. परशुराम अहिरे आणि त्यांचे सहकारी नितीन शिरसाठ यांनी पारंपारिक पद्धतीने रथासमोर मशाल लावण्याचे काम पहिले. सयाजी पाटील परिवार आणि भक्त यांच्या अथक परिश्रमातून ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह सर्व पोलिस प्रशासनाने चोख प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.