बालाजी महाराज रथोत्सवात भाविकांची गर्दी
By admin | Published: April 12, 2017 12:30 AM2017-04-12T00:30:05+5:302017-04-12T00:30:05+5:30
यावल : बालाजींच्या जयघोषाने व्यासनगरी दुमदुमली; शहरात रात्रभर रथ भ्रमण सोहळा
यावल : सुमारे १०३ वर्षाची परंपरा असलेल्या येथील श्री बालाजी महाराज रथोत्सवात मंगळवारी भाविकांची मांदियाळी फुलली होती. श्री महर्षी व्यास मंदिराच्या पायथ्यालगत नदीपात्रातून मंगळवारी सायंकाळी रथोत्सवाला सुरुवात झाली. श्री बालाजी महाराज यांच्या जयघोषात नागरिकांनी रथ ओढला. सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास महाराणा प्रतापनगराजवळ नदीपात्रात रथयात्रेचे आगमन झाले. श्री बालाजी महाराज यांच्या जयघोषाने अख्खी व्यासनगरी दुमदुमली. सायंकाळी येथील महर्षी व्यास मंदिराजवळ नदीपात्रात ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात महापूजा करण्यात आली. एक कि.मी. पर्यंत नदीपात्रातून श्री बालाजी महाराज यांच्या जयघोषात रथ ओढण्यात आला. रथमार्गावर महिलांनी घरांसमोर रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी रथाची पूजा केली जात होती. यावलचा रथोत्सव म्हणजे शहरवासीयांसाठी आनंदाची पर्वणीच मानली जाते. रथोत्सवानिमित्त बाहेरगावी असलेली नोकरदार मंडळी, माहेरवाशीन आल्या आहेत. तहसीलदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे व सहकारी यांनी कायदा सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून चोख बंदोबस्त राखला. शांतता समितीचे सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकाºयांनी सहकार्य केले.
उत्सवयात्रा, बारागाड्या आणि रथोत्सवाचा मिलाप...
महाराणा प्रतापनगराजवळील नदीपात्रात यानिमित्त यात्रा भरविण्यात आली होती. खंडोबा महाराज यांच्या बारागाड्या ओढण्यात आल्या. रथोत्सव, यात्रा आणि गाड्या पाहण्यासाठी महिलांसह शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती. यात्रा आटोपल्यानंतर श्री बालाजी रथाचे शहरात आगमन झाले. बालाजींची रथयात्रा रात्रभर सुरू होती. पहाटेच्या सुमारास भवाणी माता मंदिराजवळ रथोत्सवाची सांगता करण्यात आली.