पाचोरा येथे बालाजी रथोत्सव जल्लोषात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 09:19 PM2019-11-11T21:19:32+5:302019-11-11T21:20:49+5:30
ढोलताशांच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात पाचोरा येथील रथोत्सव जल्लोषात साजरा झाला.
पाचोरा, जि.जळगाव : ढोलताशांच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात येथील रथोत्सव जल्लोषात साजरा झाला. यात्रेने शहर फुलले होते.
बालाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक दुपारी तीन वाजता सुरू होऊन उशिरा संपली. यावर्षी रथाच्या पुजेचा मान चैतन्य पाटील आणि अश्विनी पाटील या दांपत्याला मिळाला. बालाजी महाराजांच्या रथाला दोर बांधून लोक समूहाद्वारे रथ गल्ली, विठ्ठल मंदिर रोड तलाठी कार्यालय, जामनेर रोड, महात्मा गांधी रोड या मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीत शहरातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यानिमित्ताने जामनेर रोड,शिवाजी चौक, गांधी चौक या ठिकाणी मोठी यात्रा भरलेली होती. रथयात्रेत लहान मुलांच्या खेळण्यांपासून विविध हॉटेल्स आणि भांड्यांच्या दुकानांसह वेगवेगळे स्टॉल्स असतात तर सोने चांदी, कपडे आणि भांड्यांच्या दुकानातून मोठी आर्थिक उलाढाल घडते पाचोरा तालुक्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामीण भागातून लोकांची मोठी गर्दी या यात्रेस बघायला मिळते.
बालाजी महाराजांचा रथ
बालाजी महाराजांचा रथ हा पाचोरा नगरदेवळा येथील कुशल कारागिरांनी सागवानी लाकडापासून तयार केला असून रथाची उंची ३० फूट इतकी आहे. रथावर सुंदर कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले असून, त्यावर कळस ठेवला जातो. अग्रभागी लाकडी घोडे आणि सारथी म्हणून अर्जुनाची मूर्ती बसवलेली असते. त्यांच्या दोन्ही बाजूस चोपदार यांच्या मूर्ती उभ्या केलेल्या असतात तर मागील बाजूस राक्षसाच्या मुर्त्या उभ्या केल्या असतात. पुढील भागाच्या कळसाचे खाली परी आणि हनुमान यांच्या मुर्त्या बसवल्या होत्या. रथाचे चारही बाजूस भगवे निशाण, ध्वज, केळीचे खांब, ऊस, झेंडूच्या फुलांच्या माळा लावून सुशोभित केलेला होता तसेच रथावर विजेची रोषणाई केली केली असल्यामुळे रथ खूपच विलोभनीय भासत होता.
बालाजी रथाची आख्यायिका
पाचोरा येथील अर्जुन पाटील यांचे वंशज रामा पाटील यांचे भाऊ श्यामा पाटील हे दरवर्षी दिंडीसोबत श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारी करायचे . एकदा ते पंढरपूरला वारीसाठी गेलेले असताना चंद्रभागेच्या तीरावर पाणी पिण्यासाठी नदीच्या प्रवाहात हात घातलेला असताना त्यांना श्री बालाजी महाराजांची दगडी मूर्ती त्यांना गवसली. परमेश्वर प्रसन्न झाला या भावनेने त्यांनी ती मूर्ती दिंडीसोबत पाचोऱ्याला आणले आणि हा वृत्तांत आपल्या भावांना सांगितला. श्यामा पाटील यांना मूल बाळ नसल्याने त्यांच्या वाट्याला जी संपत्ती आली तिचा विनियोग सर्व भावांनी पाचोरा येथे श्री बालाजी मंदिर तयार करण्यासाठी केला. काशी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देऊळगावराजा येथील पंडित व महंत यांच्याहस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि तेव्हापासून रथाची मिरवणूक उत्सव सुरू झाला.
रथ थांबवणे, वळवणे यासाठी लाकडी मोगरीचा उपयोग केला जातो. सदर मोगरी लावण्याचे काम अशोक वाडेकर व सुभाष सोनवणे व संपूर्ण परिवाराने पार पडले. परशुराम अहिरे आणि त्यांचे सहकारी नितीन शिरसाठ यांनी पारंपरिक पद्धतीने रथासमोर मशाल लावण्याचे काम पहिले. सयाजी पाटील परिवार आणि भक्त यांच्या अथक परिश्रमातून ही मिरवणूक लक्षवेधी ठरते लक्षवेधी ठरली. उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह सर्व पोलिस प्रशासनाने चोख प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.