सुवर्ण बाजार बंदमुळे बळीराजाही संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:47+5:302021-05-11T04:16:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांदरम्यान सुवर्ण बाजार बंद असल्याने याचा फटका सुवर्ण व्यावसायिकांसह बळीराजालाही बसत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांदरम्यान सुवर्ण बाजार बंद असल्याने याचा फटका सुवर्ण व्यावसायिकांसह बळीराजालाही बसत आहे. शेती मशागतीसाठी घरातील दागिन्यांची मोड करणे अथवा ते तारण ठेवून पैसा उभा करण्याचे साधन असलेल्या सुवर्ण पेढ्याच बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे.
कोरोनामुळे विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. त्यात देशाची अर्थव्यवस्था ज्यावर अवलंबून आहे, ती शेती देखील संकटात सापडली आहे. खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या काळातच कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने या कामांवर परिणाम होत आहे. या कामासह बी-बियाणे, खते यांच्या खरेदीसाठी शेतकरी कर्ज घेऊन आपली कामे करीत असतो. या सोबतच मिळणाऱ्या कर्जात शेती कामांचा खर्च भागणे शक्य नसल्याने शेतकरी त्यांच्याकडे असलेले सोने-चांदीचे दागिने मोडून अथवा तारण ठेवून पैसा उभा करतो.
घरात कापूस असो की इतर रब्बी हंगामातील माल पडून आहे. दुसरीकडे सुवर्ण पेढ्या बंद असल्याने दागिन्यांची मोड करता येत नाही की ते तारण ठेवता येत नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.
जास्त भाव असूनही मोड करता येईना
सोन्याचे भाव चांगलेच वाढले असल्याने शेतकऱ्यांना मोड करताना यंदा भावाचा अधिक फायदा होणार होता. यातून बळीराजाच्या हाती अधिक पैसा पडला असता. मात्र सुवर्ण पेढ्याच बंद असल्याने ना मोड, ना जास्त भावाचा फायदा करता आला नाही.
हंगामात बंद
एप्रिल, मे महिन्यात शेती मशागतीसह लग्नसराई देखील असते. त्यामुळे लग्नसराईत मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होते. या सोबतच शेतीसाठी बँकांकडून कर्ज मिळाले तरी ते हजारात असते व शेताला खर्च लाखात लागतो, त्यामुळे दागिने मोडसाठी शेतकरी सुवर्ण पेढ्यांकडे धाव घेतो. परिणामी सुवर्ण बाजारात दुहेरी उलाढाल या काळात होत असते.
दुकानांना वेळ ठरवून द्या
शेतकऱ्यांच्या हाती पैसा येण्यासाठी सुवर्णपेढ्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांसह सुवर्ण व्यावसायिक देखील करीत आहेत. यासाठी वेळा निश्चित करून दिल्या तरी शेतकऱ्यांना मोठा आधार होईल व शेतीचे अर्थकारण सुरू होईल, असाही सूर उमटत आहे.
-------------
आज शेतकऱ्यांच्या घरात कापूस तसेच इतर पिके पडून आहे. ते विकताही येत नाही. त्यात सुवर्ण पेढ्या बंद असल्याने शेतकऱ्यांना स्वत: जवळील दागिने विकता येत नाही की तारण ठेवता येत नाही. त्यामुळे शेती मशागतीसाठी पैसा कसा उभा करावा, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
- किशोर चौधरी, शेतकरी, असोदा, ता. जळगाव.
एप्रिल व मे महिन्यात लग्नसराईमुळे सोने-चांदी खरेदीसाठी गर्दी असतेच. सोबतच शेती मशागतीच्या कामासाठी देखील शेतकरी त्यांच्याकडील दागिने विक्रीसाठी आणतात. त्यामुळे या दिवसात ही दुहेरी उलाढाल होते. मात्र यंदा सुवर्ण पेढ्या बंद असल्याने हे सर्व व्यवहार ठप्प आहेत.
- भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक