बळीराम पेठ, सुभाष चौक भागात दिवसभर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:16 AM2021-05-18T04:16:54+5:302021-05-18T04:16:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून शहरातील मुख्य बाजारपेठ परिसर व मुख्य चौकात कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामुळे नेहमी गजबजलेला सुभाष चौक, बळीराम पेठ या भागात सोमवारी दिवसभर शुकशुकाट पहावयास मिळाला. एकही भाजीपाला विक्रेत्याला मनपाच्या पथकाने दुकान थाटू दिले नाही.
सोमवारी मनपा व पोलीस प्रशासनाने शहरात मुख्य बाजारपेठ परिसरात गर्दी होणार नाही यासाठी चांगलीच दक्षता घेतल्याचे दिसून आले. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईदेखील पोलीस व मनपा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यासह अत्यावश्यक सेवेच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू राहणार नाहीत यासाठीही मनपाच्या पथकाने शहरभर पाहणी करून, काही दुकानदारांवर कारवाईदेखील केली आहे.
दहा दुकाने केली सील; ५० हजार रुपयांचा दंड वसूल
मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरातील बळीराम पेठ, फुले मार्केट परिसर व नवी पेठ परिसरातील दहा दुकाने सील केली आहेत. सर्व दुकाने ही अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त व्यवसाय करणारी होती. तसेच काही कपड्यांच्या दुकानांमध्ये २०हून अधिक ग्राहक आढळून आले, तर काही दुकाने अर्धे शटर बंद करून व्यवसाय करत असल्याने या दुकानांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दहा दुकाने सील करून, प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे ५० हजार रुपयांची वसुलीदेखील केली आहे.
सुभाष चौक, बळीराम पेठेत शुकशुकाट
सोमवारी मात्र मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी सकाळी ६ वाजेपासूनच मुख्य बाजारपेठ परिसरात थांबून होते. त्यामुळे एकाही विक्रेत्याला सुभाष चौक, बळीराम पेठ या भागात दुकाने थाटू दिली नाहीत. त्यामुळे या भागात शुकशुकाट पहायला मिळाला.
चार अधिकाऱ्यांची नियुक्ती
शहरातील मध्यवर्ती भागात गर्दी कमी करण्यासाठी चार विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागामार्फत कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने टाॅवर चाैकाच्या चारही बाजूच्या मार्गावर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी नगररचना विभागाचे रचना सहायक जयंत शिरसाठ यांच्यावर दाणाबाजार परिसराची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. समीर बाेराेले यांच्यावर वैभव गल्ली व बळीराम पेठ परिसराची, प्रसाद पुराणिक यांच्याकडे सुभाष चाैक ते पुष्पलता बेंडाळे चाैकापर्यंतचा मार्ग तसेच अतुल पाटील यांच्याकडे घाणेकर चाैक ते सुभाष चाैक परिसराची जबाबदारी साेपवली आहे.