बळीराम पेठ, सुभाष चौकातील हॉकर्सला गोलाणी मार्केटमध्ये स्थलांतरित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 12:17 PM2020-05-13T12:17:11+5:302020-05-13T12:17:23+5:30

बाजारातील गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना : हरिविठ्ठलनगरचा बाजार रोखला; उपायुक्तांनी मांडले ठाण

 Baliram Peth will relocate the hawkers from Subhash Chowk to Golani Market | बळीराम पेठ, सुभाष चौकातील हॉकर्सला गोलाणी मार्केटमध्ये स्थलांतरित करणार

बळीराम पेठ, सुभाष चौकातील हॉकर्सला गोलाणी मार्केटमध्ये स्थलांतरित करणार

googlenewsNext

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बळीराम पेठ, सुभाष चौक व शिवाजी रोड भागात अनधिकृत हॉकर्सकडून होणारे अतिक्रमण व यामुळे होणारी ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी मनपा प्रशासनाकडून या भागातील नोंदणीकृत हॉकर्सचे स्थलांतर गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात करण्यात येणार आहे. याबाबत मनपा उपायुक्त व शहर अभियंत्यांनी गोलाणी मार्केटची पाहणी केली.
शहरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मुख्य बाजारात नागरिकांची गर्दी कमी होताना दिसून येत नाही. त्यातच मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून दररोज अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सवर कारवाई केली जात असतानाही हॉकर्स जुमानत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळेच आता गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नोंदणीकृत हॉकर्सलाच व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे, शहर अभियंता सुनील भोळे, मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक एच.एम.खान व किरकोळ वसुली विभागाचे प्रमुख नरेंद्र चौधरी यांनी गोलाणी मार्केटमध्ये पाहणी केली. तसेच या ठिकाणच्या ओटेधारकांना १४ मे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ओटे खाली करण्याचे आदेश दिले.
२०१२ मध्ये गोलाणी मार्केटमधील ओटे धारकांची मुदत संपली आहे. त्यामुळे सर्व ओटेधारकांनी आपले ओटे खाली करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी ओटे खाली केले नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त वाहुळेंनी दिला. मनपाच्या आदेशानंतर काही ओटे धारकांनी उपायुक्तांची भेट घेतली. मात्र, उपायुक्तांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.


हरिविठ्ठल नगरातील बाजार रोखला
बंदी असताना देखील मंगळवारी हरिविठ्ठलनगरात बाजार भरविण्याच्या तयारीत असलेल्या भाजी विक्रेत्यांना मनपाच्या पथकाने रोखून धरले. विशेष म्हणजे येथे होणारी गर्दी लक्षात घेता, उपायुक्त संतोष वाहुळे यांनी या ठिकाणी पथकासह ठाणं मांडले होते. गेल्या आठवड्यापुर्वी देखील येथे बाजार भरत सुरक्षित वावरचा फज्जा उडाला होता. याची दखल घेत मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक मंगळवारी दुपारी ४ वाजता हरिविठ्ठलनगरात पोहचले. त्यांनी त्या ठिकाणी बाजार भरविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजी विक्रेत्यांना पिटाळून लावले. त्यानतंर या ठीकाणी बाजार भरू नये यासाठी उपायुक्तांसह पथक चक्क दोन ते अडीच तास याठिकाणी थांबून होते.

नोंदणीकृत विक्रेत्यांनाच व्यवसाय करण्याची परवानगी
सुभाष चौक, बळीराम पेठ व शिवाजी रोडवरील नोंदणीकृत विक्रेत्यांनाच गोलाणी मार्केटमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्या विक्रेत्यांना व्यवसाय करायचा आहे. अशा विक्रेत्यांना मनपाने आधीच निश्चित केलेल्या ९ ठिकाणांवर व्यवसाय करण्याचा सूचना मनपा उपायुक्तांनी दिल्या आहेत.

पिंप्राळ्याचा बाजारातील विक्रेत्यांवर कारवाई करणार
बुधवारी शहरातील पिंप्राळा परिसरात भरणारा बाजार देखील भरणार नसून, या ठिकाणी विक्रेत्यांनी व्यवसाय करण्यासाठी येवू नये अशा सूचना उपायुक्तांनी दिल्या आहेत. जे विक्रेते या ठिकाणी व्यवसाय करतील अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.

Web Title:  Baliram Peth will relocate the hawkers from Subhash Chowk to Golani Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.