बॅलेट आणि कंट्रोल युनिट बंदोबस्तात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 11:39 PM2017-02-17T23:39:11+5:302017-02-17T23:39:11+5:30
जि.प. आणि पं.स. निवडणूक : आता लागले मतमोजणीच्या दिवसाकडे लक्ष, चर्चाचे नुसतेच गु:हाळ सुरु
चाळीसगाव : जि. प. व पं.स.साठी गुरुवारी मतदान झाल्यावर निवडणुकीचा धुराळा खाली बसला असला तरी वेवेगळ्या चर्चाचे गु:हाळ मात्र सुरू झाले आहे. मतमोजणीस तब्बल सात दिवसांचा अवधी असल्याने तर्कवितर्काचा पाराही वाढला आहे. सर्वच उमेदवार व मतदारांचे लक्ष आता मतमोजणीच्या दिवसाकडे लागले आहे.
चाळीसगाव तालुक्यात 257 मतदान केंद्रांवर मतदानासाठी वापरले गेलेले बॅलेट व कंट्रोल युनिट (मतदान यंत्रे) यांना शहरातील य.ना. चव्हाण महाविद्यालायत कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. 634 बॅलेट व तेवढेच कंट्रोल युनिट आहेत.
गुरुवारी सायंकाळी निवडणूक कर्मचा:यांनी आपापल्या केद्रावरील मतदान साहित्य जमा केले. यानंतर हे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला असून यासाठी दोन अधिका:यांसह 8 कर्मचारी अशा एकूण 10 कर्मचा:यांची गस्तीसाठी नियुक्ती केली आहे. महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहाशेजारीच स्ट्राँगरूम तयार करण्यात येऊन बॅलेट व कंट्रोल युनिट ठेवण्यात आले आहेत.
23 रोजी मतमोजणी होणार असल्याने 7 दिवस बंदोबस्तातील मतदान साहित्यावर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
निकाल लागण्यास वेळ असल्याने आता चर्चेस चांगला वाव मिळत आहे. अंदाज वर्तविण्यासह काही ठिकाणी पैजा लावणेही सुरू झाले असून कोण जिंकणार? हाच विषय आता आहे.
अंत्यविधीनंतर बजावला कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क
रांजणगाव, ता.चाळीसगाव येथे आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर लगेच मतदानास जाऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून येथील चव्हाण कुटुंबीयांनी गावात एक आदर्श उभा केला आहे. प्रकाश नागोजीराव चव्हाण यांची आई मनुबाई नागोजी चव्हाण (वय 81) यांचे 15 रोजी रात्री 11 वाजता निधन झाले. त्यांच्यावर 16 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. आईला अगिAडाग देऊन आल्यावर त्यांनी आपले दु:ख बाजूला सारत मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे काम केले. जिल्हा परिषद शाळेत जाऊन प्रकाश चव्हाण तसेच त्यांची पत्नी शोभाबाई, वहिनी सरलाबाई, मुलगा हितेश यांनी जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी मतदान केले. याबद्दल गावक:यांकडून चव्हाण कुटुंबीयांचे कौतुक होत आहे. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी गावातील काही बाहेरगावी असलेले चव्हाण यांचे नातेवाईक गावात आले होते व त्यांनीही मतदानाचा अधिकार बजावल्याने 30 ते 35 जणांच्या मतदानाची भर पडली.