केळीच्या तेजीला लागले गालबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:17 AM2021-09-11T04:17:44+5:302021-09-11T04:17:44+5:30
रावेर : उत्तर प्रदेशात वाढलेले केळीचे उत्पादन व आपल्या भागात करपाचा काही प्रमाणात असलेला प्रादुर्भाव यामुळे खान्देशी ...
रावेर : उत्तर प्रदेशात वाढलेले केळीचे उत्पादन व आपल्या भागात करपाचा काही प्रमाणात असलेला प्रादुर्भाव यामुळे खान्देशी केळी बाजारभावातील तेजीला गालबोट लागले आहे. व्यापारी केळीमालाची बऱ्यापैकी मागणी असतानाही जास्त नफेखोरीच्या हव्यासापोटी गुणात्मक दर्जाची प्रतवारी करून केळी भावात तडजोड करीत असल्याने घोषित बाजारभावात कपात करून केळी खरेदी करण्याचा व्यापाऱ्यांनी जणूकाही पायंडा पाडल्याची विदारक चित्र आहे. किंबहुना, रावेर व सावदा रेल्वे मालवाहतुकीने मात्र केळी बाजारपेठेतील होणाऱ्या घसरणीत संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
याव्यतिरिक्त दर्जेदार कंपनीच्या रोपविक्रीमुळे केळी उत्पादनात खान्देशची हुकूमत असताना देशभरात केळी उत्पादनाचा प्रसार होत आहे. यामुळे खान्देशची केळी उत्पादनातील सद्दी जणूकाही मोडीत निघाल्याचे चित्र आजमितीस पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेशात केळी उत्पादन वाढीस लागल्याने खान्देशातून उत्तर प्रदेश तथा उत्तर भारतात होणाऱ्या केळीमालाच्या मागणीत घट झाली आहे. इतर ठिकाणाहून आणताना भाडेवाहतुकीपेक्षा स्थानिक केळी उत्पादन माफक ठरत असल्याने खान्देशी केळीला उत्तर प्रदेशातील बाजारपेठेची कवाडे जवळपास बंद झाल्याचे विदारक चित्र आहे.
किंबहुना, उत्तर प्रदेशातली नवती केळीची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे, तर दुसरीकडे खान्देशात प्रदीर्घ खंडात उंचावलेले तापमान, ढगाळ वातावरण व तडाखेबंद पाऊस यामुळे वातावरणातील आर्द्रता वाढून करप्याने केळी बागांवर विळखा घातल्याने स्थानिक व्यापारीवर्गाला आपसूकच बहाणा मिळाला. व्यापारी हे केळीमालाची गुणात्मक दर्जाची मुद्दाम प्रतवारी करून बाजार समितीने घोषित केलेल्या बाजारभावापेक्षा किमान २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल कमी भावाने केळी खरेदी करण्याचा जणूकाही पायंडाच पाडला आहे.
करपा निर्मूलन पॅकेज मिळावे !
तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या करपा निर्मूलन पॅकेजचा निधी महायुतीच्या काळात राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पदरात टाकला नसला तरी, महाविकास आघाडीच्या सरकारने करपा निर्मूलनाचा गत पाच -सहा वर्षांपासून शासनाच्या तिजोरीत धूळ खात पडलेला केंद्र सरकारचा निधी पुनर्जीवित करून केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात टाकावा, अशी मागणी होत आहे.
तांदलवाडी येथून कांदेबाग केळीची प्रथमच होणार निर्यात
रावेर तालुक्यातील मृगबहार केळीची तांदलवाडी, कुंभारखेडा, अटवाडे, न्हावी येथून तथा जळगाव येथील जैन टिश्यू कंपनीने अद्यापपावेतो आखाती राष्ट्रांत निर्यातीसाठी भरारी घेतली असली तरी, यंदा अर्थात पुढील महिन्यापासून गुणात्मक व निर्यातक्षम दर्जाच्या कांदेबाग केळी निर्यातीसाठी तांदलवाडी येथील महाजन एक्स्पोर्ट कंपनीने आपले पहिले पाऊल टाकले आहे. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच कांदेबाग केळी निर्यातीचा शुभारंभ केला जात असल्याने या निर्यातीस प्रतिथयश मानले जात असल्याचे संचालक सदानंद महाजन यांनी स्पष्ट केले.