केळी पीक विम्याची रक्कम शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 09:51 AM2022-08-31T09:51:17+5:302022-08-31T09:52:28+5:30
जिल्ह्याला ३७५ कोटींची नुकसानभरपाईची रक्कम जाहीर झाली असून, ती रक्कम शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
जळगाव : हवामानावर आधारित फळपीक विमा ज्या शेतकऱ्यांनी काढला आहे, याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, विमा कंपनीचे प्रतिनिधी कुंदन बारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याला ३७५ कोटींची नुकसानभरपाईची रक्कम जाहीर झाली असून, ती रक्कम शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
खरीप पीक विमा योजनेत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडण्यास अडचणी येत असल्याने, याबाबत पीक विमा कंपनीसोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना गुलाबराव पाटील यांनी दिल्या. यासह हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी ३७५ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली असून, इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी ती रक्कम मिळाली आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप का मिळाली नाही? यावर देखील गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केल्यानंतर, ही रक्कम शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामसाठी जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून शेतकरी हप्त्यापोटी रक्कम ३५ कोटी २३ लाखांची रक्कम भरण्यात आल्याची माहिती या वेळी कृषी विभागाकडून देण्यात आली.
तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र
पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.