कमी खर्चात केळीचे पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:20 PM2018-02-22T12:20:55+5:302018-02-22T12:24:21+5:30
विकास पाटील यांनी केला गोमूत्र व शेणखताचा वापर
अशोक परदेशी / आॅनलाईन लोकमत
भडगाव, जि. जळगाव, दि. २२ - भडगाव तालुक्यातील वाडे येथील विकास नारायण पाटील या शेतकºयाने कष्ट अन् मेहनतीने विकास साधला आहे़ त्यांनी केळी पिकात लिंबू या आंतरपिकाची लागवड केली़ पाटील यांचे एकूण साडेतीन एकर शेतीचे बागायती क्षेत्र आहे़ डिसेंबर २०१६ मध्ये त्यांनी आंबे मोहोर केळी पिकाचे बेणे लागवड केली होती़ दीड एकर क्षेत्रात ५ बाय ५ अंतरावर २४०० खोडांची लागवड केली़ तसेच या केळी कांदे बागेत आंतरपीक म्हणून २० बाय २० अंतरावर १७० लिंबू रोपांची लागवड केली़
केळी पिकात लिंबू हे आंतरपीक घेतले़ केळी पिकाला गोमूत्र अन् शेणखत देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न दीड एकर क्षेत्रात घेतले आहे़ केळी पिकाचे आतापर्यंत सव्वातीन लाखाचे उत्पन्न हाती मिळविले आहे़ चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळण्याची आशा आहे़
केळीला शेणखत अन् गोमूत्र
शेत जमिनीच्या आंतर मशागतीचे काम करून केळी व लिंबू बागेला ठिबक सिंचनद्बारा पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले़ या शेतात केळी पीक लागवडीपूर्वी गायी, म्हशी व बैल अशी आठ जनावरे बसवून शेत शेणखत आणि गोमूत्राने रंगविण्यात आले़ शेती व्यवसायासोबतच त्यांनी जनावरे पालन करून दुग्धव्यवसायही जोपासून ठेवला आहे़ लागवडीनंतर केळी पिकाला टोपलीभर शेणखत सुरुवातीला एकदा प्रतिखोड टाकले़ लागवडीनंतर दर रविवारी केळी ठिबक सिंचनाद्वारे २५ लीटर गोमूत्राचाही नित्याने डोस दिला़ केळी बागेची वेळोवेळी आंतरमशागत केली़
या दरम्यान त्यांनी रासायनिक खते वापरण्याचे टाळले़ तसेच त्यांनी सुरुवातीला केवळ एकवेळा खोडअळीच्या नियंत्रणासाठी एक कीडनाशक वापरले़ त्याव्यतिरिक्त त्यांना पुन्हा कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरण्याची गरज पडली नाही़ त्यांनी केवळ शेणखत, गोमूत्र आणि पाण्याचे चांगले नियोजन केले़ कांदेबाग आणि लिंबूच्या झाडांनी बाग चांगली बहरली. ७ ते ८ महिन्यात केळी बागेची निसवण सुरू झाली़ १८ ते २० याप्रमाणे केळी घडांची सरासरी रास साकारली़ २४०० पैकी आतापर्यंत २००० केळी घडांची कटाई झाली़ यासाठी एकूण खर्च ३० हजार इतकाच झाला़ तर ८०० ते ९०० प्रती क्विंटल केळी पिकाला भाव मिळाला़
चार लाख उत्पन्न मिळण्याची आशा
केळीचे बागाचे आतापर्यंत सव्वातीन लाखांचे उत्पन्न आले असूऩ अजूनही उर्वरित केळी मालालाही चांगला दर मिळून उत्पन्न मिळण्याची पाटील यांना आशा आहे़ विकास पाटील यांनी केळी पिकासह लिंबू बाग फुलविण्याचा यशस्वी प्रयोग कमी खर्चात जास्त उत्पन्न असा साकारला आहे़ पुढे लिंबूचा बागही तयार होऊन लाखोंचे उत्पन्न काढण्याचे नियोजन सुरू आहे़ शेतीत अहोरात्र काम करायचे मजुरी खर्चही वाचवायचा रासायनिक खते न वापरता गोमूत्र व शेणखताचा वापर करून गुणवत्तापूर्ण उत्पन्न काढणारे विकास पाटील समाधानी आहेत़