दोन हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील केळी भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:15+5:302021-05-29T04:14:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गुरुवार, २७ मे रोजी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे केळीच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गुरुवार, २७ मे रोजी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे केळीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये २०४२.६० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले आहे. याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. दोन्ही तालुक्यांपैकी मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले आहे.
अवकाळी पाऊस व वादळ, यामुळे दर महिन्याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होत असून, बळीराजा चिंतित झाला आहे. या महिन्यात पुन्हा २७ मे रोजी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पाऊस व चक्रीवादळ झाले. यामध्ये केळीच्या पिकाला मोठा फटका बसला.
मुक्ताईनगर तालुक्यात २,००० अधिक शेतकरी बाधित
केळी उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यात यंदा जमिनीत चांगले पाणी असल्याने केळ्याचे पीक चांगले आले. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकाला बसला असून, मुक्ताईनगर तालुक्यातील दोन हजार ३५ शेतकऱ्यांचे एक हजार २८५ हेक्टर वरील केळीचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ३१ गावांना हा फटका बसला. यासोबतच रावेर तालुक्यातही २३ तालुक्यातील ९४९ शेतकऱ्यांचे ७५७.६० हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यांत मिळून २०४२.६० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले आहे.
३३ टक्क्यांच्या वर नुकसान
रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात केळीचे झालेले हे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असून, याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सादर केला.
पीक विम्याचा लाभ मिळण्याची मागणी
केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी नुकसान सहन करावे लागत असून, यामुळे हा शेतकरी हवालदिल झाला आहे. पीक विम्याची रक्कम भरूनही जाचक अटीमुळे केळी उत्पादक शेतकरी त्यापासून वंचित राहत आहे. आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पीक विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पालकमंत्री आज करणार पाहणी
रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवारी पाहणी करणार आहे. दुपारी ३.३० वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढाळदे, उचंदा, शेमळदे इतर ठिकाणी पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. ४.४५ वाजता रावेर तालुक्यातील विटवा, निंबोल, ऐनपूर व इतर ठिकाणी ते पाहणी करणार आहेत.