जळगावात जिल्ह्यात केळीला हमीभावाची गरज...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 03:59 PM2018-04-25T15:59:44+5:302018-04-25T15:59:44+5:30
खर्चाच्या तुलनेत अत्यल्प भावाने उत्पादक द्विधा मन:स्थितीत
आॅनलाईन लोकमत
चिनावल, जि.जळगाव, दि.२५ : सद्य:स्थितीत कांदे केळी बागला वेगळे, जुनारी व वापसी केळीला वेगळे असे निरनिराळे भाव काढले जात आहेत. या काढलेल्या भावापेक्षाही व्यापारी कमी भावाने केळी मालाची मागणी करीत असल्याने उत्पादकांनी केलेला खर्चही निघू शकत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे केळी उत्पादक त्रस्त होऊन पर्यायी पिकाच्या शोधात द्विधा मन:स्थितीत अडकला आहे. केळी बेणे खरेदी, शेताची मशागत, लागवड ते कापणीपर्यंतची आंतरमशागत, ठिबक, रासायनिक व जैविक खते यांचा करावा लागणारा खर्च पाहता केळी उत्पादक शेतकऱ्याला किमान चार आकडी भाव कायमस्वरूपी मिळाल्यास उत्पादकांच्या हाताला हात लागू शकतो. नाही तर पारंपरिक व सध्याच्या स्पर्धात्मक शेती व्यवसायात केळी लागवड करणे दुरापास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत केळीला मिळणारे भाव जेथल्या जेथे आहेत. बºयाच वेळा तर कमीच होताना पाहिले आहेत. मात्र दुसरीकडे केळी बागांसाठी लागणारे रासायनिक व जैविक खते, फवारणी औषधांच्या किमतीत चारपटीने वाढ झाली आहे. केळी बेणे, आंतरमशागतीची भरमसाट मजुरी यासह कापणीपर्यंतचा प्रचंड खर्च पाहता आजमितीस मिळणारे भाव हे केळीचे उत्पादन घेण्यापर्यंतच्या खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्याने केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत.
केळीला पर्यायी पीक म्हणून बघितल्या जाणाºया हळद, आले, आरवी व इतर पिके घेण्याचा प्रयत्न केळीपट्ट्यात केला गेला, मात्र या पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठीचे आधुनिक व अनुभवींच्या मार्गदर्शनाच्या अभावाने उत्पादकांची याहीकडे पाठ फिरवली जाताना दिसत आहे.
शासनाने इतर पिकांप्रमाणे केळीला हमीभाव देण्याची गरज आहे. केळी भावाचे नेमके गणितच शेतकºयांच्या आकलनापलीकडचे आहे. त्यामुळे नुकसान होत आहे.
-नितीन वायकोळे,
केळी उत्पादक शेतकरी, चिनावल, ता.रावेर.