रावेर- यावल तालुक्यातील केळीपट्ट्यात पाण्याअभावी केळी लागवड रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 05:35 PM2018-06-12T17:35:08+5:302018-06-12T17:35:08+5:30
भूगर्भातील पाण्याची कमालीची खालावलेली पातळी आणि मृग नक्षत्र अर्धे उलटूनही पावसाचा नसलेला पत्ता या मुळे रावेर- यावल तालुक्यातील केळीचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या भागात केळी लागवड रखडली असून केळी उत्पादकांनी सावध पवित्रा घेतला आहे.
आॅनलाईन लोकमत
चिनावल ता. रावेर, दि.१२ : रावेर- यावल तालुक्यातील केळी पट्ट्यात भू-गर्भातील पाणी पातळीत कमालीची घट झाल्याने अजूनही ३५ टक्के केळी लागवड रखडली आहे.
मार्च, एप्रिल, मे महिन्यात प्रचंड उन्हामुळे परिसरातील पाण्याची पातळी अधिकच खालावल्याने केळी उत्पादकांनी यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात होणारी केळी लागवड थांबवून धरली होती. अपेक्षेप्रमाणे पाण्याची पातळी खोल-खोल जात असल्यावर सुद्धा परिसरात केळी रोपे व बेणेची ६० ते ६५ टक्के लागवड उत्पादकांनी केली आहे. ती भविष्यातील पावसाळ्यात भूगर्भात पाण्याची वाढ होऊ शकते, या आशेवर. मात्र येणारा काळच ते ठरविणार आहे. तर काही केळी उत्पादकांनी सावध पवित्रा घेत अजूनही केळी लागवड केलेली नाही. त्याचप्रमाणे बागायती कपाशीची सुद्धा पेरणी अद्याप केलेली नाही. पाणी उपलब्धतेच्या सांशकतेने उत्पादक शेतकरी प्रचंड तणावात आहे. कोणत्या शेतात काय लावावे व पेरावे हे सर्वस्वी पाण्यावर अवलंबून असल्याने या आठवड्यात जोरदार पावसाच्या आगमनाची सर्वत्र प्रतिक्षा होत आहे. यंदा टिश्यु केळी रोपाची प्रचंड झालेली बुकींग व सर्व उत्पादकांचा रोपे लावण्यावर भर असल्याने परिसरातील केळी बेणे (खोडे) खोदणाऱ्या मजुरांवर सुद्धा मंदीचे सावट आहे. केळी बेणे खोदणीत मजुरांना चांगल्या प्रमाणात मजुरी मिळते. मात्र यंदा लागवडीत झालेली घट, त्यातच रोपे लावण्याकडे शेतकºयांचा असलेला कल बघता मजुरांवरही कुºहाड कोसळल्यागत आहे. एकंदरीत शेतकरी व मजुरावरही एक प्रकारे मंदीचे सावट पसरले आहे.