पाण्याच्या नियोजनावरच ठरते केळी लागवडीचे तंत्र

By admin | Published: April 7, 2017 05:11 PM2017-04-07T17:11:53+5:302017-04-07T17:11:53+5:30

केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ रावेर तालुक्याने व्यापले आहे. मात्र किरकोळ ठिकाणी नवीन लागवड करण्याचा

Banana planting technique determines water planning | पाण्याच्या नियोजनावरच ठरते केळी लागवडीचे तंत्र

पाण्याच्या नियोजनावरच ठरते केळी लागवडीचे तंत्र

Next

ऑनलाइन लोकमत
केऱ्हाळे,ता.रावेर, दि. 07 -  केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ रावेर तालुक्याने व्यापले आहे. मात्र किरकोळ ठिकाणी नवीन लागवड करण्याचा अपवाद वगळता क्षेत्रफळाच्या तुलनेत लागवड शून्य आहे. भूगर्भातील पाण्याचा स्त्रोतावर आधारीत कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीच्या नियोजनावर नवीन लागवड करण्याचे तंत्र अवलंबून आहे.
जिल्ह्यातील केळी लागवडीचे एकूण क्षेत्रफळ सन २०१५-२०१६ मध्ये ४८ हजार २८० हेक्टर एवढे होते. २०१६-२०१७ मध्ये त्यात वाढ होऊन ते सुमारे ५१ हजार हेक्टर क्षेत्रफळ इतके झाले आहे. यात सर्वाधिक क्षेत्रफळ व्यापणारा रावेर तालुक्याची व्याप्ती १९ हजार ७७३ हेक्टर क्षेत्रफळ सर्वसाधारण केळीने व्यापले आहे. एवढ्या क्षेत्रफळातील केळी आता पुढे कापणीस सज्ज झाली असून पाणीपुरवठा व उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची रंगीत तालीम सुरू झाली आहे.
एप्रिल महिन्यात नवीन केळी लागवड करण्यास फारसा शेतकरी धजावत नाही. कारण पावसाळा व हिवाळा या ऋतुमध्ये नवीन केळी व जुनारीमधील रब्बीचे आंतर पीक मका, गहू व हळद,तूर या पिकांचे पाणी भरण्याचे नियोजन करून पाणी देणे शक्य होते. हिवाळ्यातील चार महिन्यांमध्ये केळी बागेला सतत पाण्याची गरज नसते. यामुळे इतर पिकांना पाणी देवून उत्पादन घेणे शक्य होते. मार्च पर्यंत रब्बीतील सर्व हंगाम आटोपून एप्रिल, मे व जून या महिन्यांमध्ये केळी पिकांना सतत पाणी द्यावे लागते. यामुळे नवीन लागवड करण्याकडे लक्ष दिले जात नाही. कारण महिना दीड महिन्यात केळी कापणीतून हातात येणारा पैसा सोडून भविष्यात येणारी केळी खोडी लांब ठेवूनच लागवड केली जाते. याला दुसरे कारण म्हणजे तप्त उन्हाच्या कडक लाटांमध्ये नवीन केळी लागवडची खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा लवकर लागवड करून सुद्धा निम्मे केळी कुजून फेकून द्यावी लागते. जमिनीचे क्षेत्रफळ आज रोजीही अनेक शेतकऱ्यांचे तयार आहे. परंतु पाण्याचे नियोजना अभावी लागवड उशिरा केली जात आहे.
रामनवमीला केली जाते लागवड
रावेर व यावल तालुक्यात काही भागात रामनवमीनंतर केळी लागवडीचा मुहूर्त काही शेतकरी साधतात याला शेतकरी भाषेत (रामबाग) म्हणून ओळखले जाते. यात बहुतांश तांदलवाडी, वाघोदा, न्हावी या भागात काही प्रमाणात लागवड केली जाते. 

देशी बियाणे झाले हद्दपार...
केळी लागवडीत सध्या टिश्युकल्चर ग्रॅडनेन या जातीने शेतकऱ्यांना भुरळ घातली आहे. टिश्युच्या प्रथम कापणीनंतर निघणाऱ्या कंद लागवडवर आजही सामान्यत ७० टक्के शेतकरी अवलंबून आहे. या विदेशी जातीने अक्षरश: कहर माजवला आहे. यापूर्वीचे देशी वाण श्रीमंती, अर्धापुरी, वसई, सातमासी श्रीमंती या देशी वाणांची उत्पादक क्षमता कमी असल्याची केवळ ओरड केली जाते. मात्र दर्जा, गोडवी व कोणत्या तरी वातावरणात उन्हामध्ये कमी-अधिक पाण्याचा ताण सहन करणाऱ्या देशी वाणांच्या जाती विकसीत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न दिसून आले नाहीत. यामुळे अत्यंत तकलादू व विविध रोगांना बळी पडणाऱ्या टिश्युकल्चर ग्रॅडनेन या विदेशी जातीला प्राधान्य दिले जात आहे.

- केळी लागवडीसाठी रामनवमीचा मुहूर्त.
- दर्जा,गोडवी व कमी-अधिक पाण्याचा ताण सहन करणाऱ्या देशी वाणांच्या जाती विकसीत करण्याची गरज.
- टिश्युकल्चर ग्रॅडनेन जातीची शेतकऱ्यांना पडली भूरळ.
- श्रीमंती,अर्धापुरी,सातमासी या देशी वाणांचा वापर व्हावा.

Web Title: Banana planting technique determines water planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.