केळी, गहू, मका, बाजरीला ‘अवकाळी’ तडाखा, १०० कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:20 PM2020-03-19T12:20:58+5:302020-03-19T12:21:33+5:30
वीजेचे खांब कोसळण्यासह गुरेही दगावली
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तापी काठावरील गावांतील केळी, गहू, मका, बाजरी, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून विजेचे खांब, वृक्ष उन्मळून पडण्यासह गुरेही दगावली. या नुकसानग्रस्त भागास बुधवारी पाणीपुरवठा व स्वच्छतमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त गावातील पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला दिले. जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा समोर आला नसला तरी १०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
केळी, गहू, मका, बाजरी, भाजीपाल्याचे नुकसान
जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये केळी, गहू, मका, बाजरी व भाजीपाला इत्यादी पिकांचा समावेश असून विजेचे खांब, तारा तसेच वृक्ष उन्मळून पडल्यामुळे आतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गुरेही दगावली आहेत. या अवकाळी पावसाचा तापी काठावरील गावांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीबद्दल पालकमंत्री पाटील यांनी बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी चर्चा करुन जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी पंचनामे करण्याची सूचना केली.
त्यानंतर पालकमंत्र्यांनी जळगाव तालुक्यातील भोकर, भादली, नांद्रा, पिलखेड, सावखेडा, कठोरा, नंदगाव, किनोद आदी गावामध्ये जाऊन शेतकºयांची भेट घेतली व नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
याप्रसंगी पालकमंत्र्यासमवेत उप विभागीय अधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे, तालुका कृषि अधिकारी सचिन बºहाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुभाष राऊत यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, राजेंद्र चव्हाण, भरत बोरसे, मुरलीधर पाटील यांच्यासह पं.स. सदस्य, विविध गांवाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
तारा तुटल्याने गावातील वीज पुरवठा बंद
वादळी वाºयामुळे अनेक गावांमध्ये वीजेचे खांब वाकले असून तारा तुटल्याने गावातील वीज पुरवठा बंद आहे. तुटलेल्या तारांची दुरुस्ती लवकरात लवकर करुन वीज पुरवठा सुरु करावा तसेच रस्त्यांवर उन्मळून पडलेले वृक्ष बाजूला हटवून रस्ता मोकळा करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आमदारांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन आपल्या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची व पिकांची माहिती घेतली. नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करुन शासनास नुकसानीचा अहवाल पाठविण्यात येईल व जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असेही पालकमंत्र्यांनी शेतकºयांशी चर्चा करताना सांगितले.
पीक विमा अर्ज ४८ तासात भरा
ज्या शेतकºयांनी पिकांचा पीक विमा काढलेला आहे, अशा शेतकºयांनी तातडीने नुकसानीबाबत विहित नमुन्यातील पीक नुकसान सूचना फॉर्म पूर्ण भरुन ४८ तासांच्या आत विमा कंपनीकडे अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकºयांना केले.
नुकसानग्रस्त शेतकºयांनी अर्ज करण्याचे आवाहन
सततचा अवकाळी पाऊस आणि गारपिटमुळे काढून ठेवलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानी संदर्भातील विहित नमुन्यातील पीक नुकसान सूचना फॉर्म भरून ४८ तासांच्या आत विमा कंपनीच्या ई-मेल आयडीवर पाठवावेत अथवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जमा करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.