माहेरघरीच केळीला मिळतेय सापत्न वागणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:34 AM2020-03-06T04:34:17+5:302020-03-06T04:34:24+5:30
केळीसाठी टिश्यूकल्चर लॅब उभारण्याची घोषणा हवेतच विरली. खतांचे भाव आणि मजुरीही तिपटीने वाढली आहे. किमान सलग आठ तास विजेची अपेक्षा पूर्ण होत नाही.
चुडामण बोरसे
जळगाव : केळीचे माहेरघर असलेल्या जळगावमध्येच केळीला सापत्न वागणूक मिळत आहे. केळीला फळाचा दर्जा मिळण्याच्या घोषणा हवेतच विरल्या तसेच पोषण आहारातही तिचा समावेश झाला नाही. केळींवरील रोगांच्या उपाययोजनांसाठी साधी प्रयोगशाळाही उभारली गेली नाही.
जिल्ह्यात सुमारे ५० ते ६० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. केळीची मागणी आणि पुरवठा चांगला असला तरच चांगला भाव मिळत असतो. केळी काढल्यानंतर पहिल्या महिन्यात एक टनाला १२०० तर दुसऱ्याच महिन्यात ८०० रुपयांचा एकढा कमी भाव मिळत असतो. केळीवर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत. केळीसाठी टिश्यूकल्चर लॅब उभारण्याची घोषणा हवेतच विरली. खतांचे भाव आणि मजुरीही तिपटीने वाढली आहे. किमान सलग आठ तास विजेची अपेक्षा पूर्ण होत नाही.
>हे भेद दूर व्हावेत...
मृग बहारमधील केळीला चांगला भाव दिला जातो. पण कांदेबागातील केळीचे भाव नेहमी कमी - जास्त होत असतात. केळीला एका हेक्टरसाठी साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो. शेतकºयांना मात्र सोसायटीकडून ८० हजार रुपये आणि बँकेकडून १ लाख २० हजार एवढे कर्ज मिळते, उर्वरित पैसा उभा करावा लागतो. केळीसाठी फक्त ४१ ते ४२ हजार हेक्टर क्षेत्रालाच हवामानावर आधारित फळ पीक विमा लागू आहे. तो इतर क्षेत्रालाही मिळायला हवा.
>केळीला फळाचा दर्जा मिळावा आणि पोषण आहारात समावेश व्हावा, यासाठी शासनच उदासीन आहे. शासनाला हे करायचे नाही, असे आतापर्यंतच्या घोषणांवरुन दिसत आहे.
- डॉ. सत्वशील जाधव,
केळी अभ्यासक