पथराडच्या डोंगरकुशीतील केळी सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:52+5:302021-07-07T04:19:52+5:30
गेल्या महिन्यात झालेला बेमोसमी पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले होते; परंतु अशाही परिस्थितीत गेल्या दहा महिन्यांत केळीच्या ...
गेल्या महिन्यात झालेला बेमोसमी पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले होते; परंतु अशाही परिस्थितीत गेल्या दहा महिन्यांत केळीच्या बागांची योग्य काळजी घेतली. त्यामुळे तालुक्यातील केळी प्रथमच इराणसाठी रवाना झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही प्रेरणादायी बाब आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीदेखील तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करण्यावर भर दिला आहे.
पथराड येथील शेतकरी शिवाजी पीतांबर पाटील यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची जबाबदारी त्यांच्यावर आली. गेल्या पंचवीस वर्षांपासून ते केळी पिकवीत आहेत. यंदा दोन हेक्टरवर केळीची लागवड केली. गेल्या १५ वर्षांपासून शेतात नवनवीन प्रयोग करतात, तसेच त्यांना ॲग्रीसर्च प्रा. लि., नाशिक, विसपुते व सुशील पाटील यांचेदेखील मार्गदर्शन लाभले आहे. या शेतकऱ्यांची केळी दर्जेदार असल्याने नाशिक येथील सह्याद्री कंपनीमार्फत त्यांची केळी थेट परदेशात रवाना झाली. यावेळी कंपनीचे कर्मचारी महेश माळी, महेंद्र परदेशी, तसेच व्यापारी पवन पाटील, चेतन मराठे, डॉ. भोकरे, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
आजवर बोर्डाच्या दरापेक्षा कधीही अधिक दर मिळाला नव्हता. आज आमच्या बागेतील केळी परदेशात जात असल्याने खूप आनंद होत आहे. शेतकऱ्यांनीदेखील तंत्रशुद्ध पद्धतीने शेती केल्यास फायदा होईल. त्यासाठी काळानुसार बदलणे आवश्यक आहे.
-शिवाजी पाटील, बाळकृष्ण वाणी
शेतकरी
बांगलादेशी मजूर कार्यरत
पथराड येथील केळी बॉक्स पॅकिंग करून कंटेनरने मुंबईला पाठविण्यात आली. तेथून जहाजाने केळी इराणला पाठविली जाणार आहे. या निर्यातक्षम केळीला १ हजार २६१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. केळीची तोडणी व विशिष्ट पद्धतीने पॅकिंग करण्यासाठी खास बांगलादेशी मजूर काम करीत आहेत.
060721\06jal_1_06072021_12.jpg
पथराडच्या डोंगरकुशीतील केळी सातासमुद्रापार