चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव तांडा येथे बंजारा अहिंसा संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 05:53 PM2019-08-20T17:53:42+5:302019-08-20T17:55:44+5:30
बोकड बळी या अनिष्ट प्रथेमुळे समाजातील सामान्य जनतेचे मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान व शोषण होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
चाळीसगाव, जि.जळगाव : बोकड बळी या अनिष्ट प्रथेमुळे समाजातील सामान्य जनतेचे मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान व शोषण होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बोकड बळीची प्रथा बऱ्याचशा प्रमाणात बंद झाल्या असल्यातरी काही प्रमाणात सुरू आहे. या प्रथेला रोखण्यासाठी सामाजिक व कायदेविषयक उपाययोजना करणे शासनाला अत्यावश्यक झाले आहे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे झालेल्या बंजारा अहिंसा संमेलनात केले.
प्राणी मित्र इंदल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलन, यात्रेतील पशुहत्या विरोध चळवळीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सव, बंजारा अहिंसा संमेलन व प्राणी मित्र इंदल चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अविनाश पाटील बोलत होते.
परमपूज्य दगाजी महाराज यांच्या प्रेरणेने समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे कार्य प्राणीमित्र इंदल चव्हाण यांनी हाती घेऊन, यात्रेतील बोकड बळी प्रथा, अनिष्ट रूढी परंपरा या विरोधात राज्यभर जनजागृती अभियान राबविले. गेली २५ वर्षे सतत संघर्ष करणारे इंदल चव्हाण यांच्या कार्याचे फलित झाल्याचे समाजाने स्वीकारले.
अध्यक्षस्थानी माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून संतोषजी महाराज चोपाळेकर, भारतीय बहुजन क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मोरसिंग राठोड, निवृत्त पोलीस उपअधीक्षक यू.एन.राठोड, जि.प.चे माजी सदस्य सुभाष चव्हाण, रामदास रायसिंग जाधव, काशिनाथ राठोड, देवेंद्र नायक, चिंतामण चव्हाण, बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष राकेश जाधव, जि.प.चे माजी सदस्य राजेंद्र राठोड, कैलास सूर्यवंशी, मदन राठोड, जवाहरलाल राठोड, साहेबराव पुना राठोड, सरपंच सारिका राठोड, संतोष राठोड, ओंकार जाधव, अॅड.वाडीलाल चव्हाण, भरत चव्हाण, बळीराम माऊली आदी सर्व विविध पक्ष, संघटनेचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश पोतदार व भीमराव जाधव यांनी केले.