हरियाणाच्या टोळीनेच फोडले जळगाव जिल्ह्यातील बॅँकाचे एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:05 PM2018-01-31T12:05:29+5:302018-01-31T12:10:11+5:30
जिल्ह्यातील भुसावळ, किनगाव व धानोरा येथे एकाच रात्री एटीएम फोडून त्यातील आठ लाख रुपये लांबविणारी टोळी हरियाणातील मेवान जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून या टोळीने बडोद्यात ६ एटीएम फोडून ३३ लाख तर सुरतमध्ये दोन एटीएममधून एक कोटी रुपये लांबविले आहेत. दरम्यान, चोरटे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या गुजरात व कोलकाता पोलिसांवर या टोळीने गोळीबारही केल्याची माहिती समोर आली आहे.
सुनील पाटील
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, ३१ : जिल्ह्यातील भुसावळ, किनगाव व धानोरा येथे एकाच रात्री एटीएम फोडून त्यातील आठ लाख रुपये लांबविणारी टोळी हरियाणातील मेवान जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून या टोळीने बडोद्यात ६ एटीएम फोडून ३३ लाख तर सुरतमध्ये दोन एटीएममधून एक कोटी रुपये लांबविले आहेत. दरम्यान, चोरटे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या गुजरात व कोलकाता पोलिसांवर या टोळीने गोळीबारही केल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या महिन्यात १४ जानेवारी रोजी भुसावळ, किनगाव व धानोरा येथे एकाच रात्री पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडून त्यातील आठ लाख रुपये लांबविले होते. एटीएम फोडण्याआधी या चोरट्यांनी भुसावळमधून एक चारचाकी चोरली होती. ही चार चाकी दुसºया दिवशी बडोदा शहरात एका एटीएमच्या बाजुला आढळून आली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बडोदा येथे गेले असता तेथेही या चोरट्यांनी सहा ठिकाणचे एटीएम फोडले होते. हनुमान टेंपल, मकरापुरा, वागोडीया रोड, सनप्लाझा, माजलपुर कॉलनी व अन्य एक अशा सहा ठिकाणचे एटीएम फोडून त्यातील ३३ लाख रुपये या टोळीने लांबविले होते.
सीसीटीव्ही व चारचाकीवरुन उलगडा
जळगाव जिल्ह्यात एटीएम फोडणाºया टोळीनेच बडोदा व सुरत शहरात एटीएम फोडल्याचे सीसीटीव्ही कॅमे-यातील फुटेज व भुसावळची चोरलेली चारचाकी बडोद्यात आढळल्याने या गोष्टीचा उलगडा झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी सहायक निरीक्षक राजेंद्र होळकर, विजय पाटील, रवींद्र पाटील व विनयकुमार देसले यांच्या पथकाला गुजरातमध्ये पाठविले होते. या पथकाने केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
सुरतमध्ये नोव्हेंबर महिन्यात एकाच खोलीत असलेले दोन एटीएम मशीन फोडून त्यातील तब्बल एक कोटी रुपये याच टोळीने लांबविले आहेत. रेल्वेचे जंक्शन शहरेच टार्गेट रेल्वेचे जंक्शन असलेले शहरच या टोळीने टार्गेट केले आहेत. ज्या शहरात एटीएम फोडायचे तेथून एक चार चाकी वाहन चोरी केले जाते. त्यानंतर गॅस कटर, गॅस सिलिंडर व अन्य साहित्य खरेदीसाठी एक जण एक दिवस आधी त्या शहरात येतो. गॅस कटरने एटीएम फोडले की त्याच वाहनातून ही टोळी पुढच्या शहरात जाते. जेथे शेवट करायचा, तेथे चोरलेली गाडी सोडून सर्व जण वेगळे होतात व बसने आपल्या गावात पोहचतात.