पारोळा येथे बँक मॅनेजर सीबीआयच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 10:24 PM2020-09-03T22:24:37+5:302020-09-03T22:27:33+5:30
पीक कर्ज मंजुरीसाठी ७५ हजार रुपयांची लाच घेणे पारोळा शहरातील गुजराथी गल्लीतील बॅक आॅफ बडोदा या बँकेच्या व्यवस्थापकासह पटरला भोवले. दोघे आरोपीना पुणे सीबीआय पथकाने अटक केली.
पारोळा : पीक कर्ज मंजुरीसाठी ७५ हजार रुपयांची लाच घेणे पारोळा शहरातील गुजराथी गल्लीतील बॅक आॅफ बडोदा या बँकेच्या व्यवस्थापकासह पटरला भोवले. दोघे आरोपीना पुणे सीबीआय पथकाने अटक केली. त्यामुळे बँकींग क्षेत्रात खळबळ माजली आहे. ही घटना ३ रोजी घडली. बँक व्यवस्थापक किरण ठाकरे व खासगी पंटर नरेंद्र गणेश पाटील अशी लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
दरम्यान, कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बँकेत होणारी लुटालूट या घटनेतून जनतेसमोर आली आहे.
पारोळा तालुक्यातील तक्रारदार शेतकºयाच्या कर्ज मंजुरीसाठी बँक व्यवस्थापक किरण ठाकरे यांनी आठ टक्क्यांप्रमाणे लाचेची मागणी केली होती. शेतकºयाचे कर्ज सात लाख १० हजार मंजूर झाले होते. लाच देण्यासाठी तक्रारदार शेतकरी बँकेत गेला होता. मात्र आरोपींनी रोकड स्वरुपात लाच न घेता शेतकºयाकडून बेअरर चेक घेतला व तो गुरुवारी वटवला. त्यातील २५ हजार पंटरने व ५० हजार रुपये मॅनेजरने स्वत:जवळ ठेवून घेतले.
याआधी लाचेची पडताळणी बुधवारी पुणे येथे सीबीआयने पूर्ण केली होती. त्यानुसार दोघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी आरोपींना अटक करण्यात आली.
घरात तब्बल १० लाखाची रोकड
अटकेनंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात बँक व्यवस्थापकाच्या घरात तब्बल १० लाखाची रोकड आढळून आली. ती रक्कम जप्त करण्यात आली.
ही कारवाई पुणे सीबीआयचे पोलीस अधीक्षक भगेंद्र कढोले, पो.कॉ.सतीश बोराडे, धनसिंग व पथकातील पोलीस करीत आहे.