पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे बँकेचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 03:16 PM2019-07-19T15:16:58+5:302019-07-19T15:18:12+5:30
गेल्या तीन दिवसांपासून वरखेडी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे व्यवहार इंटरनेट सेवेअभावी ठप्प झाले आहेत. बँक कर्मचारी व ग्राहकदेखील कमालीचे वैतागले आहेत.
वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून वरखेडी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेचे व्यवहार इंटरनेट सेवेअभावी ठप्प झाले आहेत. बँक कर्मचारी व ग्राहकदेखील कमालीचे वैतागले आहेत.
सर्वच व्यवहार बँकेमार्फत होत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्राहकांचे अर्थचक्र थांबले आहे. उलाढाल करण्यासाठी खात्यातून रक्कम काढायला गेले असता इंटरनेट सेवेच्या वारंवार खंडित होण्यामुळे याचा थेट परिणाम ग्राहकांना भोगावा लागत आहे.
वरखेडी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेची ग्राहक संख्या जवळजवळ ११ हजार आहे. २२ ते २५ खेड्यातील जनता या बँकेशी संलग्न असल्याने त्यांचा पुरता हिरमोड होत आहे.
जळगाव ते चांदवड रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्यामुळे बी.एस.एन.एल. केबल वारंवार तुटून सेवा देताना व्यत्यय येत आहे. यामुळे दैनंदिन होणारे लाखोंचे व्यवहार तीन दिवसांपासून पूर्णत: शट डाऊन झाले आहेत. शासन एकीकडे पेपरलेस व्यवहाराला महत्त्व देत असले तरी यावरदेखील या इंटरनेट सेवेच्या खंडित होण्याने परिणाम होत आहेत.
वास्तविक बँक आॅफ महाराष्ट्र शाखा वरखेडीतर्फे बँकेच्या प्रवेशद्वारावर सूचना फलक लावण्यात आलेला आहे की, ‘इंटरनेट सेवा खंडित असल्यामुळे बँकेचे व्यवहार बंद आहेत. असुविधेबाबत क्षमस्व’ असा सूचनाफलक असतानाही ग्रामीण भागातील जनता थेट बँक कर्मचाऱ्यांशी संभाषण करून मोठ्या अपेक्षेने विचारणा करीत असते. व्यवहार केव्हा सुरू होतील. परंतु दिवसभर बँक कर्मचारीदेखील या सर्वांना समजून समजून बेजार होत आहेत.
बी.एस.एन.एल.अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांचेदेखील मोबाइल हे बी.एस.एन.एल. सेवा युक्त असल्यामुळे त्यांच्याशीही संपर्क साधता येत नसल्याने आणखीनच भर पडली आहे.
तसेच याठिकाणी येणाºया तमाम बँक ग्राहकांची अपेक्षा आहे की, बँक आॅफ महाराष्ट्रच्या वतीने ग्राहकांना सेवा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे बँक शाखेचा लाभ आर्थिक व्यवहार करताना व्यत्यय येणार नाही व पैशांअभावी लोकांची कामे खोळंबणार नाहीत. कारण सध्या शेती हंगामाचे दिवस असून शेतकरी वर्गास पैशांची नितांत आवश्यकता भासत असते.