२७ मार्च रोजी बँकांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:37 AM2020-03-09T11:37:35+5:302020-03-09T11:37:47+5:30
जळगाव : सरकारी बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाविरुद्ध आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र एम्पॉईज् असोसिएशन व आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र ...
जळगाव : सरकारी बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाविरुद्ध आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र एम्पॉईज् असोसिएशन व आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स असोसिएशनच्यावतीने २७ मार्च रोजी संप पुकारण्यात आला आहे.
बँक कर्मचाऱ्यांचा वेतन करार रखडल्याने त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ११ ते १३ मार्च दरम्यान संप पुकारण्यात आला होता. मात्र आता तो मागे घेण्यात आला आहे. त्यानंतर आता सध्या कार्यरत असलेल्या दहा सरकारी बँकाचे त्यांच्याहून सक्षम असलेल्या चार सरकारी बँकांमध्ये विलिनीकरण करण्याच्या योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. येत्या १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. त्या विरोधात दोन्ही संघटनांच्यावतीने २७ मार्च रोजी संप पुकारला असल्याची माहिती असोसिएशनचे नाशिक विभागाचे उपाध्यक्ष मोहन खेवलकर यांनी दिली. सध्या बँकांचे विलिनीकरण व त्या नंतर बँकांचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा हेतू असल्याने हा निर्णय घातक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
मार्चमधील उर्वरित २२ दिवसांपैकी ८ दिवस बँका बंद
मार्च महिन्याच्या उर्वरित २२ दिवसांपैकी तब्बल आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये १० मार्च रोजी धुलीवंदनची सुट्टी असून १४ मार्च रोजी दुसरा शनिवार, १५ व २२ रोजी रविवार, २५ रोजी गुढीपाडव्याची सुट्टी, २७ रोजी संप, २८ रोजी चौथा शनिवार व २९ रोजी रविवार आहे. त्यामुळे या महिन्यात १० मार्चपासून महिनाअखेरपर्यंत ८ दिवस बँका बंद राहणार आहेत.