घरोघरी बाप्पाचे आगमन, उत्साहाला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 07:17 PM2020-08-22T19:17:03+5:302020-08-22T19:18:43+5:30
‘कोरोना’च्या सावटाखाली लाडक्या बाप्पाचे घरोघरी उत्साहात आगमन झाले.
भुसावळ : ‘कोरोना’च्या सावटाखाली लाडक्या बाप्पाचे घरोघरी उत्साहात आगमन झाले. यंदा गणेशभक्तांना सामाजिक आणि सुरक्षिततेचे भान जपण्याचे आवाहन शासनाकडून सातत्याने केले जात आहे.
चेहऱ्यावर सकारात्मक भाव
लॉकडाऊनमुळे बराच काळ घरात अडकून पडलेले नागरिक विशेषत: गृहिणी शुक्रवारी खरेदीसाठी बाहेर पडल्याने उत्साहात आणखीनच भर पडली. अर्थात या गर्दीत विघ्नहर्त्याच्या आगमनाने कोरोना रुपी दु:ख दूर होईल, असा सकारात्मक भाव गणेशभक्तांच्या चेहºयावर झळकत होता. काही भक्तांच्या घरी एक दिवस आधीच गणरायाचे आगमन झाले.
खरेदीला झुकते माप
शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसातही बाप्पाच्या आगमनासाठी सामान खरेदीसाठी तुफान गर्दी बाजारपेठेत झाली होती. जणू शहरात कोरोनाचा संसर्ग नाहीच याच आविभार्वात गणेशभक्तांनी दिलखुलास खरेदीला झुकते माप दिले.
पावसामुळे चिखल, वाहतूक कोंडी
शुक्रवारी व शनिवारी पडलेल्या पावसामुळे चिखल, वाहतूक कोंडीमुळे अनेक ठिकाणी गणेशभक्तांना सामोरे जावे लागले. फळे, भाज्या, फुलांपासून पूजेचे साहित्य कपड्यांपर्यंत सर्व दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अनलॉक सुरू असला तरी विनाकारण गर्दी करणे मंडळाचे पदाधिकारी टाळत आहेत. मात्र चैतन्य घेऊन येणाºया बुद्धीच्या आणि कलेच्या देवतेचे स्वागत करण्यात भुसावळकरांनी गर्दीच्या बाबतीत कुठलीही कसर न सोडल्याचे दिसून आले.
गणेश भक्तांनी आवर्जून मास्क, हातमोजे घालण्यावर भर दिला, तर मूर्तिकारांना सॅनिटायजेशन, सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करता यावे यासाठी येण्या-जाण्याच्या मार्गावर विशेष सोय करण्यात आली होती. सामान खरेदीसाठी दिसणारी अलोट गर्दी गणपती आगमन वेळी मात्र जाणीवपूर्वक टाळण्याबाबत नागरिकांनी संयम दाखवला. जवळच्या अंतरासाठीदेखील गणेश भक्तांनी स्वत:चे वाहन किंवा रिक्षा, हातगाडीचा उपयोग करण्यास प्राधान्य दिले. विशेष म्हणजे समाज प्रबोधनासाठी आपल्या बाप्पाला मास्क लावला होता.
चौथा ‘म’ म्हणून मास्कला प्राधान्य
या गणेशोत्सवात मूर्ती, मखर, मोदक यासोबत चौथा ‘म’ म्हणून मास्कला प्राधान्य देण्याचे आवाहन सोशल मीडियावर होताना दिसत आहे. गणपती बाप्पा मोरया... एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार घोषणा ढोलताशाच्या गजरात पारंपरिक वेशात भगवी टोपी, फेटा, डोक्याची पट्टी परिधान करून अति उत्साहात घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली.
डोक्याला भगवी पट्टी
बाजारात गणपतीच्या मूर्ती सजावट व पुजेच्या वस्तूंचे स्टॉल्स लागले होते. प्राणप्रतिष्ठेसाठी ठरलेल्या मुहूर्तच्या वेळेस बाजारपेठेत गर्दी उसळली होती. विविध आकारातील, वेशातील, सुंदर सुबक मूर्ती बाजारात उपलब्ध होत्या. पारंपरिक वेषात नागरिक गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी आले होते. डोक्याला भगवी पट्टी अशी वेशभूषा होती, सेल्फीसाठी कॅमेरे लखलखले. दुसरीकडे सार्वजनिक मंडळाचे देखावे पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू होती.